सातारा दि. 16 : "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान" शिबीर कार्यक्रमाचे दि. 31 मे 2023 अखेर 11 तालुक्यांमध्ये आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे यांनी दिली आहे.
समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून न्याय मिळावा यादृष्टीने महिलांच्या अडचणींचा शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पीडित महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी तालुकास्तरावर "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान" शिबीराचे आयोजन केले आहे.
दि. 17 मे रोजी सातारा, दि. 19 मे रोजी पाटण, दि. 22 मे रोजी महाबळेश्वर, दि. 23 मे रोजी खंडाळा व वाई, दि. 25 मे रोजी माण (दहिवडी), दि. 26 मे रोजी कोरेगाव, दि. 29 मे रोजी खटाव व फलटण, दि. 30 मे रोजी कराड, दि. 31 मे रोजी जावली (मेढा) या तालुक्याच्या ठिकाणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्यातील समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी त्यांचे प्रश्न, अडचणी व तक्रारींची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी विहित नमुन्यामध्ये संबंधित तालुक्यातील अंगणवाडी सेविका/अशा वर्कर्स यांच्यामार्फत तालुक्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करुन त्यांच्या तालुक्यामध्ये आयोजित केलेल्या शिबीराच्या दिनांकास मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री. तावरे यांनी केले आहे.