फलटण प्रतिनीधी :
केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर केल्या नंतर शनिवार दिनांक 16 ला दुपारी 3 पासून आचारसंहितेचा अंमल सर्वत्र सुरु झाल्याने माढा लोकसभा मतदार संघतील 255 फलटण कोरेगाव ( अ. जा.) मतदार संघात प्रशासकीय पातळीवर निवडणूक प्रक्रियेच्या हालचाली सुरु झाल्या असून फलटण तालुक्यातील प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे. त्यासाठीची सर्वं यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी तथा फलटण कोरेगाव विधानसभा (अ. जा.) मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फलटण - कोरेगाव (अ. जा.) विधानसभा मतदारसंघात प्रशासनाने काय कार्यवाही केली याची माहिती देण्यासाठी प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक भवनाच्या आवारातील नगर पालिकेच्या इमारतीत नव्याने सुरु केलेल्या लोकसभा निवडणूक प्रक्रिया कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत प्रांताधिकारी सचिन ढोले बोलत होते. फलटणचे तहसीलदार तथा अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अभिजित जाधव, नायब तहसीलदार सौ.संजीवनी बोबडे - सावंत, नायब तहसीलदार एन. डी. काळे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रांताधिकारी म्हणाले की, लोकसभा निवडणूक अधिसूचना दिनांक 12 एप्रिलला जारी होणार असून एप्रिल 19 पर्यंत उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र सोलापूर येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी दाखल करावयाची आहेत. नामनिर्देशन पत्र कार्यालय वेळेत दाखल करायची आहेत. नामनिर्देशन पात्राची छाननी दिनांक 20 एप्रिल रोजी होणार आहे. तर उमेदवारी माघारी घेण्याची अखेरची मुदत 22 एप्रिलला असणार आहे. यानंतर निवडणूक चिन्ह वाटप केले जाणार आहे. प्रत्यक्ष निवडणूक मतदान दिनांक 7 मे रोजी होणार असून निकाल दिनांक 4 जून रोजी जाहिर होणार असल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.
४३ माढा लोकसभेतील फलटण - कोरेगाव २५५ (अ.जा) फलटण विधानसभा मतदार संघामध्ये एकूण ३,३४,८५५ एवढे मतदार आहेत. त्यामध्ये पुरुष १,७१,४५४ तर स्त्री मतदार ह्या १,६३,३८७ आहेत व तृतीयपंथी मतदारांची संख्या १४ आहे.
४३ माढा लोकसभेतील फलटण - कोरेगाव २५५ (अ.जा) फलटण विधानसभा मतदार संघामध्ये एकूण मतदानाची ठिकाणे 222 यामध्ये फलटण शहरातील 27 तर ग्रामीम भागात 195 आहेत. तर या सर्वं ठिकाणातील एकूण मतदान केंद्राची संख्या 341 असून या मध्ये फलटण शहरातील 44 तर ग्रामीण भागात 297 केंद्र आहेत.या मतदार संघात एकूण 2045 अधिकारी व कर्मचारी निवडणूक मतदान प्रक्रियेत कार्यरत राहणार आहेत. तर
आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्यासाठी ५ फिरती पथके तैनात करण्यात आली असल्याचे शेवटी प्रांताधिकारी तथा फलटण कोरेगाव विधानसभा (अ. जा.) मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
फलटण - कोरेगाव विधानसभा (अ. जा.) मतदार संघातील मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने गेल्या काही महिन्यापासून मतदारांच्या मध्ये जनजागृती करण्यासाठी अभियान राबविण्यात आले होते. या अभियाना मध्ये प्रशासना बरोबरच काही स्वयंसेवी संस्थांनी देखील सहभाग नोंदवला होता. त्यामुळे या वेळी मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी या अभियानाचा उपयोग होणार आहे - तहसीलदार तथा अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अभिजित जाधव.