फलटण प्रतिनिधी -
प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये घरकुलासाठी शासकीय जागा उपलब्ध करून देणेबाबत पुणे विभागात फलटण तालुका महसूल विभाग दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे, तर फलटण तालुक्यातील भूमिहीन नागरिकांना शासकीय जागा उपलब्ध करुन दिल्या प्रकरणी सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांच्या उपस्थितीत सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती यशीनी नागराजन यांच्या हस्ते फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले व तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांना सन्मानीत करण्यात आले.
फलटण तालुक्यातील एकूण ४३ लाभार्थींना घरकुलासाठी शासकिय जागा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामध्ये हणमंतवाडी ११, राजुरी ११, पिंप्रद ५, ढवळ ५, जिंती ११ अशा एकूण ४३ त्यापैकी १३ घरकुले पूर्ण, १० प्रगतीपथावर,तर ७ लाभार्थींनी अजून घर बांधणी सुरू केली नाही. ६ लाभार्थी इच्छुक नसल्याने रद्द केली आहेत व ७ लाभार्थी प्रतिक्षा यादीमध्ये आहेत.
प्रांताधिकारी सचिन ढोले व तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी यापूर्वीही फलटण तालुक्यातील अनेकांना न्याय देण्याचे काम केले आहे. तर नुकत्याच संपलेल्या लोकसभा निवडणुकीतही उल्लेखनीय नियोजन केल्याचे सर्वश्रुत आहे.