फलटण : सचिन मोरे
फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांची नुकतीच कोल्हापूर जिल्यातील गडहिंग्लज येथे बदली झाल्याने फलटण नगरपालिकेचा कारभार पाहण्यासाठी सक्षम अधिकारीच नसल्याने कारभाराचे तीन तेरा उडाल्याचे चित्र सध्या फलटण मध्ये पहावयास मिळत आहे. पाणीपुरवठा, स्वच्छता आदी महत्वाच्या ठिकाणी कामकाज संथ गतीने सुरु आहे. तर आर्थिक वर्ष 31 मार्चला संपत असले तरीही वसुली विभाग अजूनही सक्रिय नसल्याने फलटण नगर परिषदेचे कामकाज राम भरोसे असल्याचे दिसते आहे.
या विभागाबरोबरच आता ऑफिस कामकाजही ठप्प झाल्याचे पाहावयास मिळत असल्याने नागरिकांना हेलपाडे मारल्याशिवाय गत्यंतरच राहिले नाही. कामावर हजर असणारे कर्मचारी जागेवर उपस्थित नाहीत तर अधिकाऱ्यांसह क्लार्कच्या खुर्च्या व टेबल ओस पडले आहेत.
सध्या अनेक विभागात प्रिंटिंग पेपरही उपलब्ध नसल्याचे अनेक कर्मचारी नाव नसांगण्याच्या अटीवर बोलत आहेत. तर कामानिमित्त नगर पालिका कार्यालयात आलेले नागरिकांना उद्धटपणे बोलणे किंवा कोणत्याच प्रश्नांना सरळ उत्तर न देणे असे प्रकार सुरु असल्याने फलटणच्या नागरिकांची तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावे लागल्या सारखी परिस्थिती झाली आहे.
ऑनलाईन काम पाहणारे कर्मचारी वेबसाईट बंद असल्याचे सांगत असून मोबाईल मध्ये व्यस्त असल्याचे चित्र आवाक करणारे आहे. तर जन्म - मृत्यू त्याच प्रकारचे विविध ऑनलाईन दाखले यासाठी अनेक महिला, वयोवृद्ध नागरिक नगरपालिका कार्यालयात हेलपाटे मारून अक्षरशः मेटाकुटीस आल्याचे दिसते आहे. याविषयी वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता सी.आर एस.पोर्टल बंद असल्यामुळे कामकाज ठप्प असल्याचे सांगितले.