फलटण प्रतिनिधि :
प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वजारोहन करताना त्याठिकाणी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावून संविधान उद्देशीकेचे सामुहीक वाचन करावे अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा हरिष उर्फ आप्पा काकडे यांनी सहकाऱ्यांसह निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी सातारा यांना दिला आहे.
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा दक्षता व संनियंत्रण समिती, सातारा यांना त्यांच्या कार्यालयात जाऊन हरिष उर्फ आप्पा काकडे, राकेश जगताप, दत्तात्रय अब्दागिरे, राजू कांबळे, सनी कदम यांनी सदर निवेदन दिले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दि. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधान, संविधान सभेला सादर केले तो दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो, तसेच दि. २६ जानेवारी १९५० पासून भारतीय संविधानाचा अंमल सुरु झाला, म्हणजेच भारत प्रजासत्ताक झाला. त्या दिवसाचे औचित्य साधून प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज फडकविण्यात येत असतो, परंतू डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विसर आज शासन व प्रशासनाला पडलेला दिसत आहे, म्हणून प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज फडकविताना भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावून व संविधान उद्देशीकेचे सामुहीक वाचन करावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली असल्याचे हरिष उर्फ आप्पा काकडे यांनी सांगितले.
प्रशासनाने निवेदनातील मागणीनुसार कार्यवाही न केल्यास आमरण उपोषण छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे हरिष काकडे, राकेश जगताप, दत्तात्रय अब्दागिरे, राजू कांबळे, सनी कदम यांनी दिला आहे, या निवेदनावर त्यांच्या सह्या आहेत.