सातारा, दि. 16 (जि.मा.का.) – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा दि. 18 जून ते 22 जून 2023 या कालावधीत जिल्ह्यातून मार्गस्थ होणार आहे. जिल्ह्यामध्ये संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे लोणंद – 2 दिवस, तरडगांव – 1 दिवस, फलटण – 1 दिवस, बरड – 1 दिवस असे एकूण 5 दिवस मुक्काम आहेत. या मुक्कामांच्या ठिकाणी वारकऱ्यांसाठी पिण्याचे स्वच्छ पाणी, शौचालय तसेच इतर महत्वाच्या सुविधा पाणी व स्वच्छता विभागामार्फत उभारण्यात आल्या आहेत. निर्मलवारीसाठी पाणी व स्वच्छता विभागाची तयारी पूर्ण झाली आहे.
पालखी मार्गावर मुक्कामी व विसाव्याच्या ठिकाणी प्रती दिन 1 हजार 500 शीट शौचालयांची व्यवस्था केली आहे. पालखी मार्गावरील गावातील सर्व खासगी वैयक्तिक शौचालये वारकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात येतात. यासाठी प्रत्येक शौचालयावर ग्रामपंचायतीमार्फत पांढरे झेंडे लावण्यात येतात. त्याठिकाणी वापरण्यासाठी व हात धुण्यासाठी पाण्याची व साबणाची व्यवस्था केली आहे. पालखी सोहळ्यासाठी फिरते शौचालये उभारणी आणि सनियंत्रण करणे व शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी स्वच्छता विभागातील जिल्हा तज्ज्ञ व तालुकास्तरीय बी.आर.सी यांची पूर्णवेळ नियुक्ती केली आहे.
महिलांसाठी शौचालयाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यांच्यासोबत 20 शौचालय युनिट मागे 1 महिला नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मुक्कमाच्या गावात 24 ठिकाणी स्नानगृहांची सुविधा उभारली आहे. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र तात्पुरत्या मुतारीची सुविधा उभारली आहे.
पालखी मार्गावरील गावातील सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची रासायनिक व जौविक तपासणी पूर्ण केली आहे. दररोज पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची ओ.टी. घेण्याबाबतही सूचना केल्या आहेत.
पालखीत सहभागी वारकऱ्यांमध्ये स्वच्छता व पाणी विषयांची जनजागृती माहिती प्रदर्शन स्टॉल उभारण्यात येणार आहे. पालखी मार्गावरील गावांमध्ये दर्शनी भागात स्वच्छता उपक्रमांचे फ्लेक्स लावण्यात येणार आहेत. सहभागी वारकऱ्यांमध्ये जनजागृतीसाठी प्लास्टिक बंदी, पाणी गुणवत्ता, घन कचरा व सांडपाणी व्यवस्थापन, संत गाडगेबाब ग्राम स्वच्छचा अभियानाविषयी माहिती देणाऱ्या घडी पत्रिकांचे वाटप होणार आहे. पालखी मार्गावरील गावांमध्ये दर्शनी भागामध्ये स्वच्छता अभियान व जल जीवन मिशन यांचे ठिकाणी सचित्र संदेश रंगविण्यात आलेत. तसेच विसावा व मुक्कामाच्या ठिकाणी प्लास्टिक संकलन केंद्र उभारण्यात येणार आहे.
तालुकास्तरावरील सर्व खातेप्रमुख, विस्तार अधिकारी (पंचायत) गट समन्वयक, समूह समन्वयक, ग्रमासेवक, प्राथमिक मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य सेवक इत्यादींची संपर्क अधिकारी म्हणून जिल्हास्तरावरून व तालुकास्तरावरून नेमणूक केली आहे. पालखी कालावधीत महाविद्यालयातील व राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी सहभागी होणार असून त्यांच्यामार्फत स्वच्छता विषयत उपक्रम व अभियनाची प्रसिद्धी केली जाणार आहे.
पालखी मार्गावरील विसावा व मुक्कामाच्या गावात आंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात महिलांच्या मासिक पाळी व्यवस्थापन इन्सिनेटर मशीन बसविण्यात येवून त्यासाठी संपर्क महिला अधिकारी यांची नेमणूक केली आहे.



















