फलटण प्रतिनिधी :
फलटण नगर परिषदेमध्ये मागील तब्बल ३० वर्षांपासून मागासवर्गीय विशेष कल्याण समिती स्थापन करण्यात आलेली नाही. त्यामुळे मागासवर्गीय समाजाच्या प्रश्नांकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले गेले नसल्याची भावना नागरिकांत आहे.
ही बाब लक्षात घेता सन २०२५ ते २०३० या पंचवार्षिक कालावधीत फलटण नगर परिषदेमध्ये मागासवर्गीय विशेष कल्याण समिती तातडीने स्थापन करण्यात यावी, अशी ठाम मागणी नगरसेविका सौ. सुपर्णा सनी अहिवळे यांनी नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी नगरसेवक सचिन अहिवळे, अमित भोईटे, राहुल निंबाळकर उपस्थित होते.
मागासवर्गीय समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकासासाठी स्वतंत्र समिती आवश्यक असून, या माध्यमातून विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविता येतील, तसेच या समाजाच्या अडचणी व समस्या थेट नगर परिषदेत मांडण्यास एक सक्षम व्यासपीठ उपलब्ध होईल, असे मत सौ. अहिवळे यांनी व्यक्त केले.
नगर परिषदेमध्ये सर्व समाजघटकांचा समतोल विकास साधायचा असल्यास मागासवर्गीय विशेष कल्याण समितीची स्थापना अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.



















