सातारा : येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या, रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांच्या ‘संविधानाच्या स्वप्नातलं गाव’ या कवितासंग्रहास महाराष्ट्र साहित्य परिषद राजगुरूनगर या संस्थेने प्रथम क्रमांक जाहीर करत पद्मश्री नामदेव ढसाळ काव्यप्रतिभा पुरस्कार २८ जानेवारी २०२३ रोजी जाहीर केला आहे. परिषदेकडे आलेल्या ७० कवितासंग्रहात ‘संविधानाच्या स्वप्नातल गाव ’ कवितासंग्रहाने प्रथम क्रमांक मिळविला. द्वितीय क्रमांक प्रा. लक्ष्मण महाडिक यांच्या स्त्री कुसाच्या कविता’ या संग्रहास, संदीप धावडे यांच्या’ परिवलन परिभ्रमण’ या कविता संग्रहास तृतीय क्रमांक, उत्तम सावंत यांच्या ‘कुरकुल ‘कविता संग्रहास चौथा तर सौ.माधुरी विधाटे यांच्या ‘मल्हारधून’ कवितासंग्रहास पाचवा क्रमांक मिळाला आहे. सदर पुरस्कारांचे वितरण रविवार दिनांक १२ फेब्रुवारी २०२३ रोजी पंचायत समिती राजगुरुनगर ता.खेड.जिल्हा पुणे येथे केले जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या राजगुरूनगर
शाखेचे अध्यक्ष मा.संतोष गाढवे यांनी दिली. २०२१ चे पुरस्कार कोरोना अभावी जाहीर करण्यात आले नव्हते.



















