फलटण वार्ताहर -
कनिष्ठ महाविद्यालयीन अर्थशास्त्र राज्य विचारमंच आणि सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालय कराड यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक सात व आठ जानेवारी २०२३ रोजी राज्यस्तरीय अर्थशास्त्र सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने आणि अर्थशास्त्र राज्य विचार मंचाचे अध्यक्ष प्रा. डॉ. शरद शेटे यांनी दिली.
सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालय कराड येथील डॉक्टर एन डी पाटील सभागृहात कनिष्ठ महाविद्यालयीन अर्थशास्त्र राज्य विचार मंचाचे २३ वे अधिवेशन होणार असून या निमित्ताने होणाऱ्या राज्यस्तरीय अर्थशास्त्र सहकार परिषदेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या शुभहस्ते होणार आहे. प्राचार्य डॉ. मोहन राजमाने हे अध्यक्षस्थानी आहेत. गोवा विद्यापीठाचे माजी अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अनिल पडोशी प्रमुख वक्ते असून त्यांचे बीजभाषण होणार आहे. यावेळी विचार मंचाचे अध्यक्ष प्रा. डॉ. शरद शेटे व माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय परीक्षा शिक्षण मंडळाचे प्रभारी सचिव डी एस पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयीन अर्थशास्त्र शिक्षकांनी लिहिलेल्या शोधनिबंधावरील अर्थवेध या पुस्तिकेचेही प्रकाशन होणार आहे.
यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेची 75 वर्षे, ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकास आणि सातारा जिल्ह्याच्या विकासात सहकार क्षेत्राचे योगदान या विषयावरील शोधनिबंधांचे सादरीकरण होणार आहे. तसेच इयत्ता अकरावी व बारावीच्या अर्थशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रम व मूल्यमापनावर चर्चासत्र आयोजित केले आहे.
रविवारी सकाळी शोधनिबंधांचे सादरीकरण आणि समारोप समारंभामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या इकॉनॉमिक्स असोसिएशन कोल्हापूरचे अध्यक्ष डॉक्टर राहुल म्होपरे आणि रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य अॅड. रवींद्र पवार यांच्या उपस्थितीत समारंभ होणार आहे.
या परिषदेबाबत अधिक माहितीसाठी विचार मंचाचे समन्वयक प्रा सतीश जंगम ७५८८५५९८९८ आणि प्रा. डॉ. ए के पाटील ९८२२२४८०८२ यांच्याशी संपर्क साधावा. या अर्थशास्त्र सहकार परिषदेसाठी सातारा सांगली कोल्हापूर जिल्हा बरोबरच राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयातील अर्थशास्त्र व सहकार विषयाच्या शिक्षकांनी उपस्थित रहावे असे आवाहन राज्यस्तरीय अर्थशास्त्र परिषदेचे स्थानिक कार्यवाह डॉ. ए के पाटील यांनी केले आहे.



















