कोरोनाचे संकट पुन्हा एकदा येऊ घातल्याने श्री मरीमाता यात्रेमध्ये सहभागी होणाऱ्या भक्तगणांनी मास्कचा वापर करून सामाजिक अंतर राखत यात्रेचा आनंद घ्यावा : मरी माता यात्रा कमिटी पिंपरद, फलटण

प्रति वर्षाप्रमाणे यावर्षीचा पिंपरद (ता. फलटण ) येथील श्री मरीमाता यात्रा उत्सव शुक्रवार दिनांक 7 व शनिवार दिनांक 8 एप्रिल २०२३ रोजी मोठ्या उत्सहात संपन्न होत आहे. दोन दिवस चालणाऱ्या मरीमाता यात्रेचा उत्सव दिनांक ०७ एप्रिल पासून सुरु हॊत असून या दिवशी पहाटे ४:३० वा. देवीचे स्नान होणार आहे. तर सकाळी ७ वाजता महाआरतीने यात्रेच्या उत्सवाची सुरुवात होणार आहे. सकाळी १०.०० वाजता देवीला पुरणपोळीचा नैवैद्य दाखविला जाणार आहे.
दुपारी 2 वाजता मानाच्या काठीचे आगमन होणार आहे. यात्रेत आसू (फलटण ) येथील घोरपडे यांच्या काठीचा मान असतो. माळेगाव, शिरवली, सांगवी, सरडे, साठे या ठिकाणाहून काठ्या येणार आहेत. मानाच्या काठांच्या आगमनानंतर सायंकाळी ४ वाजता नैवद्य म्हणून बकरी कापली जाणार आहेत. तर यात्रेकरूंच्या मनोरंजनासाठी रात्री ९:३० वाजता सौ.पायल सावंत गोतंडीकर तमाशा मंडळाचा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे.
शनिवार दिनांक ८ एप्रिल रोजी पहाटे 5 ते दुपारी 12 वाजेपर्यंत देवीचा छबिना निघणार आहे तर व सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत हजेरीचा सौ.पायल सावंत गोतंडीकर तमाशा मंडळाचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ४ वाजता प्रतिवर्षाप्रमाणे कुस्ती आखाडा भरणार आहे. या कुस्ती आखाड्यामध्ये विविध गावचे मल्ल आपली कुस्ती कौशल्य दाखवणार आहेत. मरीमाता यात्रेकरिता सातारा,पुणे, मुंबई, कोल्हापूर या जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भक्तगण मोठ्या संख्येने येत असतात. कोरोना सारख्या आजाराचे संकट पुन्हा येऊ घातल्याने यात्रेमध्ये सहभागी होणाऱ्या भक्तगणांनी मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे असे आवाहन श्री मरीमाता यात्रा उत्सव कमिटी पिंपरदच्या वतीने करण्यात आले आहे.



















