फलटण प्रतिनिधी :
फलटण नगर पालिकेकडे कोंडवाडा असूनही मोकाट पशुधनावर अजून कोणतीच कारवाई होत नसल्याने आधी डुकरे नंतर मोकाट गाई तर आता गाढवे झाली उदंड अशीच म्हणण्याची पाळी फलटण शहरवासियां पुढे आली आहे.
फलटण शहरातील पशुधन पालक जनावरांना शहरांत सोडून ते मोकळे होत आहेत. इकडे रस्त्यावर या पशुधनाचा ठिय्या असतो. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर जागोजागी ठिय्या असल्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत.
फलटण शहरातील ठीक ठिकाणी वराह ( डुकरे ) मोकाट गाई तर आता चक्क गाढवे रस्त्यावर ठाण मांडून बसलेली दिसू लागली आहेत. शहरातील पंढरपूर रोड, गिरवी रोड, सातारा रोड, पुणे रोड तसेच शहरातील अंतर्गत रस्त्यांवर वर्दळीच्या ठिकाणी भर चौकामध्ये पशुधन थांबलेले असतात. त्यांच्यापासून वाहन काढताना कसरत करावी लागते. किती हॉर्न केला तरी रस्त्यावरून जनावरे हटता हटत नाहीत. अनेकदा अपघात झाले आहेत. केवळ नगरपालिकेकडून पशुधन पालकांवर कारवाई केली जात नसल्यामुळे मोकाट पशुधन पालक सोकावले आहेत.
मोकाट पशुधनाला कोंडवाड्यात घालण्यासाठी आणि संबंधित मालकाला दंड ठोकण्यासाठी जनावरे पकडण्याचीच कारवाई होताना दिसत नाही.
खासगी गोशाळेकडे पशुधन देण्याची कोणतीही ठोस भूमिका केलेली दिसत नाही नाही. त्यामुळे मोकाट पशुधन सोडणार यांचे फावत आहे. वाहनधारकांना ठिय्या मांडलेल्या जनावरांचा त्रास होत आहे. मात्र, नगर पालिकेकडून यावर उपाययोजना सध्या तरी होताना दिसत नाहीत.
मुक्याधिकारी संजय गायकवाड यांनी वृत्तपत्र प्रतिनिधीना बोलावून शहरातील मोकाट डुकरे पकडण्याची मोहीम यशस्वी करण्याची घोषणा केली होती. यासाठी वराह (डुकरे ) पकडण्यासाठी कर्नाटक राज्यातून विशेष पथक बोलावून डुकरे पकडण्यात आली होती. मात्र ती पकडलेली जनावरे नेमकी कुठे सोडली यावरही शहरात उलट सुलट चर्चा सुरु आहेत. त्यामुळे अगोदर डुकरे नंतर मोकाट गाई तर आता गाढवांचे नवे संकट शहरवासीयांपुढे उभे ठाकले आहे.