सातारा, दि. 23 – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्ताने हरितवारी, जिल्हा सनियंत्रण समिती व वनमहोत्सव 2023 अंतर्गत वन विभाग, वन्यजीव विभाग व सामाजिक वनीकरण विभागामार्फत वृक्ष दिंडी, सिडबॉल व बियाणे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्य वनसंरक्षक आर.एम. रामानुजम यांच्या हस्ते झाले. यावेळी एच.जी.धुमाळ, वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण, पुणे, यु.एस.सावंत उप संचालक, सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूर स्थित कराड, एम.एन. मोहिते, उप वनसंरक्षक सातारा, एच.एम.वाघमोडे, विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण, सातारा, सागर गवते, विभागीय वन अधिकारी (दक्षता) निर्देशन विभाग, कोल्हापूर, तिन्ही विभागातील सर्व सहाय्यक वनसंरक्षक, वन क्षेत्रपाल व क्षेत्रीय कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी मौजे तरडगाव येथे सामाजिक वनीकरण विभागामार्फत सीड बॉल व बियाणे वाटप स्टॉल ठेवण्यात आला होता. समाजिक वनीकरण विभागांतर्गत विविध योजनांचे माहिती फलक तयार करून याबाबतची माहिती वारकऱ्यांना देण्यात आली. सीड बॉल 20 हजार व विविध प्रकारच्या 20 हजार बियाणंची पाकीटे वाटप करण्यात आली. ही वृक्ष दिंडी तरडगाव येथून सुरू होऊन मोजे सुरवडी येथे सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमात शाहीर विठ्ठल झोडे यांच्या कृष्णाई कलामंच यांचा वृक्षलागवड, वन संरक्षण व वन संवर्धन याविषयी जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केला होता. तसेच अभंग, ओव्या, भक्तीगिते यांच्या माध्यमातून वृक्षलागवड, संरक्षणाबाबत माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.



















