प्रतिनिधी सातारा
1995 पासून छत्रपती शिवप्रभूंची पालखी सोहळा काढण्याची परंपरा रायगड ते पंढरपूर अशी आहे. या पालखी सोहळय़ाचा प्रारंभ शिवनेरीच्या पायथ्यापासून झालेला असून रायगड येथून माती घेऊन हा पालखी सोहळा पंढरपूर येथे पोहचला. तेथे शिवबा- विठोबा भेट घडवून आणत पुन्हा राजधानी साताऱयात गुरुवारी दुपारी पोहोचली. सातारकरांच्यावतीने या पालखी सोहळय़ाचे स्वागत करत राजधानीमध्ये महाराणी येसूबाई आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट घडवून आणली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी या पालखी सोहळयाचे स्वागत केले.
गेली 28 वर्ष शिवछत्रपती पालखी सोहळा आषाढी वारीत पायी चालण्याची परंपरा जपलेला सोहळा सुरु आहे. शक्तीभक्तीचा महासंगम असलेला या सोहळय़ाची सुरुवात छ. शिवाजी महाराजांची जन्मभूमी शिवनेरी येथून करण्यात आला. या पालखी सोहळय़ात संदीप महिंद गुरुजी यांच्यासह धीरज घोळवे, गणेश शिंदे, कृष्णा भोसले, वेदांत सावरडेकर, प्रणव करमरकर, साहिल शेख यांचा सहभाग आहे. हा पालखी सोहळा शिवजन्मीभूमी शिवाई मंदिरापासून जुन्नर, भोसरी, लाल महाल हडपसर, वडकी मल्हारगड, श्री कऱहाबाई मंदिर, केदारेश्वर मंदिर, कापुरहोळ, श्री शिवस्फुर्ती स्मारक भोर, वरंधा महाड, श्री. आऊसाहेब समाधी पाचाड, दि. 1 रोजी रायगडावर पोहोचली होती. तेथून रायगडावर भवानी मंदिर, राजसदर, होळीचा माळ, हिरकणी बुरुज, कोळंबी तलाव, श्री शिवप्रभू समाधी छत्री मंदिर रायगड असा पालखी सोहळा रायगडाहून पंढरपूरच्या दिशेने रवाना झाला होता.
पंढरपूरात दि. 29 रोजी पायी प्रवास करत पोहोचला. तेथे नगरप्रदक्षिणा घालून शिवबा-विठोबा भेट घडवून आणत शस्त्र रिंगण पार पडले. संत सप्तक तुकोबाराय, नामदेव, माऊली, निवृत्तीनाथ, मुक्ताई, सोपानकाका, एकनाथ दर्शन घेऊन हा पालखी सोहळा पुढे महूद, दिघंची, विटा, नृसिंहवाडी, हुपरी, श्री नेवापूर, मसाईचे पठार, कुंभारवाडी, धनगरवाडा, आंबेवाडी, पाटेवाडी, पावनखिंड, विशाळगड, कोल्हापूर, गडहिंजग्लज, निपाणी, वडगाव, बत्तीस शिराळा करत साताऱयात प्रवेश केला.
गुरुवारी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या तळबीड गावात स्वागत करण्यात आले. पुढे हा पालखी सोहळा राजधानी साताऱयात शिवतीर्थ येथे दुपारी पोहोचला. तेथे छत्रपती शिवप्रभूंच्या स्मारकाचे दर्शन घेत या पालखी सोहळय़ातील छ. शिवाजी महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. त्यानंतर हा पालखी सोहळा संगममाहुलीच्या दिशेने नेण्यात आला. तेथे छ. शिवाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांची भेट घडवून आणली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के उपस्थित होते. त्यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पुढे हा पालखी सोहळा मेढा वाई मार्गे शिवनेरीकडे प्रस्थान झालेला आहे.



















