थांबवा रे थांबवा या वेड्या धर्मांध झुंडी !
आपल्याच माणसांच्या कापू नकात मुंडी !
पाडूनिया धर्मस्थळे ही कोणी धर्मवीर म्हणती
वैर कधीचे काढूनिया जातधर्म भेदभाव करती
तलवारी,चाकूने ठार करुनिया धर्म म्हणती
हिंसेचा धर्म कसला ? झुंडी सुख हिरावती
इतिहासाच्या दुश्मनीची रोज उबविती अंडी
आपल्याच माणसांच्या कापू नकात मुंडी !
अस्मितेचे झेंडे लावून ,वैर वाढवीत नेले
बंधुतेचे गाव सारे, कोण लढवीत गेले ?
पेरले द्वेष त्यांनी ,पाखरांच्या शाळेत या
जाती-धर्म वर्चस्वासाठी पेटविला भारत हा
चिखल फेकुनिया खून करती हे कोण घमंडी ?
आपल्याच माणसांच्या कापू नकात मुंडी !
हिंदू ,मुस्लीम ,शीख इसाई ,भाई भाई है सारे
गुरुजींनी शिकविलेले विसरले का हे गीत सारे ?
या भारतात बंधुभाव नित्य वसु दे,संत गाती सारे
इन्सानियत नाकारतील कशी इथले देव सारे ?
रोपे लावा विविध फुलांची, भरून जाऊ देत ही कुंडी !
आपल्याच माणसांच्या कापू नकात मुंडी !
सुखासाठी जगतात सारे हे जीव या धरेवरती
गाडलेली मडी उकरून,हे जीव वृथाच मरती
चिंध्या काढून गाठोड्यातील,अन्याय अन्याय रडती
विस्फारून डोळे,तलवारी,सत्तारी वस्ती, मोहोल्ल्यात चिडती
घडवू आपला प्रेमळ भारत,नकोत हिंसेच्या झुंडी !
आपल्याच माणसांच्या कापू नकात मुंडी !
प्रा.डॉ.सुभाष वाघमारे
मराठी विभाग प्रमुख
छत्रपती शिवाजी कॉलेज,सातारा
९८९०७२६४४०


















