फलटण | धैर्य टाईम्स |
फलटण नगरपालिका हद्दी मध्ये कोणत्याही प्रकारे फ्लेक्स अथवा होर्डिंग लावण्यास बंदी आहे मात्र याचा विसर पालिका प्रशासनाला इतका पडला आहे की काय त्याला कारणही तसेच आहे. फलटणचे माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांचा फोटो असलेल्या त्यांच्या उद्योग समुहाचा अनधिकृत होर्डींग फलटण शहरातील सार्वजनिक बांधकाम विश्रामगृहा शेजारी झळकत होता. सदर अनधिकृत होर्डिंग प्रकरणीधैर्य टाईम्सची बातमी प्रकाशित होताच सदरचे अनधिकृत होर्डींग हटवण्यात आले. मात्र तात्काळ दिलीपसिंह भोसले यांच्या अमृत महोत्सवाचे होर्डींग गिरवी नाक्या नाजिक झळकू लागले आहेत. त्यामुळे अनधिकृत होर्डींग लावण्याचा मान माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांच्य कुटुंबाकडे देण्यात आल्याची चर्चा सध्या फलटण शहरात सुरु आहे.
काही दिवसापूर्वीच जिंती नाका येथे असणारे महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण तसेच स्व. वेणूताई चव्हाण यांचे स्मारक शिल्प एका संगणक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेच्या जाहिरातीचे झाकून टाकले आहे यामुळे नागरिक संतप्त झाले होते. वृत्त पत्रातून यासंबंधी बातम्या प्रकाशित झाल्यानंतर तात्काळ संबंधित होर्डिंग काढण्यात आले. मात्र यावरही नगर पालिका प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नसल्याचे निखिल मोरे यांनी धैर्य टाईम्सशी बोलताना सांगितले.
शहरात होर्डिंग व फ्लेक्स बंदी असताना गेली अनेक दिवस खाजगी संस्थेचे हे होर्डिंग पालिका अधिकारी व कर्मचारी यांना का दिसले नाही असा सवाल आता फलटणकर विचारू लागले आहेत.
काही दिवसापूर्वी फलटण शहरातील अनधिकृत अतिक्रमणावर हातोडा मारणारे मुख्याधिकारी निखिल मोरे कोणतीही कारवाई करत नसल्याने फलटणकर नागरिक आश्चर्य व्यक्त करू लागले आहेत.