फलटण दिनांक १६ ( प्रतिनिधी )
गुढीसाठी लागणाऱ्या साखरगाठी बनविण्याच्या कामाला फलटण मध्ये वेग आला असून यंदा साखरगाठी महागणार आहेत. हिंदू धर्मामध्ये वर्षभर विविध सण साजरे केले जातात. हिंदू वर्षाचा प्रथम सण किंबहुना हिंदू वर्षांची सुरुवात गुढीपाङव्याने होते. गुढीपाङवा हा साङेतीन मुहुर्ता पैकी एक मानला जातो. या दिवशी नवीन घराची पायाभरणी, नवीन उद्योग व्यवसायाची सुरुवात, नवीन चारचाकी, दुचाकी खरेदी करतात. या दिवशी प्रत्येक व्यक्ती आपल्या घरावर गुढी उभारतो. या गुढीसाठी साखरगाठीचा हार घातला जातो. त्यामुळे गुढीपाडव्याला साखरगाठी ला मोठी मागणी असते. या साखरगाठी बनविण्याच्या कामाला फलटण मध्ये वेग आला असून येथील लक्ष्मणशेठ मोरे यांचा साखरगाठी बनविण्याचा परंपरागत व्यवसाय आहे. रंगबिरंगी, पांढऱ्या शुभ्र साखरगाठी बनविण्याच्या काम येथे सुरु आहे. इंधन आणि मजूरी दरवाढ झाल्याने दरवर्षी पेक्षा यावर्षी साखरगाठी महागणार असल्याचे लक्ष्मणशेठ मोरे यांनी सांगितले.



















