सहकार क्षेत्रात अग्रणी असणाऱ्या सातारा जिल्हा मध्य.सह.बँकेस भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने बँकेच्या ग्राहकांना थेट मेंबरशिपद्वारे NEFT/RTGS ची सुविधा सुरु करणेस मान्यता दिली असून बँकेच्या कार्यपद्धतीवर पसंतीची मोहोर उमटवली आहे.
सातारा : सातारा जिल्हा मध्य.सह. बँक ३१९ शाखा व ५८ एटीएम च्या माध्यमातून ग्राहकांना अविरत सेवा देत असून ग्राहकांच्या सोयीकरिता एटीएम, पॉज, युपीआय, मोबाईल बँकिंग, बीबीपीएस, आरटीजीएस, एनईएफटी इ. सुविधा देत आहे. सहकार क्षेत्रात अग्रणी असणाऱ्या सातारा जिल्हा मध्य.सह.बँकेस भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने बँकेच्या ग्राहकांना थेट मेंबरशिपद्वारे NEFT/RTGS ची सुविधा सुरु करणेस मान्यता दिली असून बँकेच्या कार्यपद्धतीवर पसंतीची मोहोर उमटवली आहे.
यापुर्वी ग्राहकांना शाखेमधून NEFT/RTGS करणेची सुविधा सब मेंबरशिपद्वारे (SponsorBank- IDBI) द्वारे बँकेचा IFSC कोड IBKL0485SDC चा वापर केला जात होता. भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये असलेल्या चालू ठेव खात्यावरून थेट मेंबरशिपद्वारे NEFT/RTGS व्यवहाराकरिता बँकेच्या सर्व शाखांना स्वतंत्र IFSC कोड प्राप्त झालेले असून सदर सुविधा दिनांक ०८ ऑक्टोबर २०२१ पासून सुरु केलेली आहे. IFSC कोड ची माहिती बँकेचे अधिकृत वेब साईटवर व बँकेच्या शाखा नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करणेत आलेली आहे.
बँकेचे अध्यक्ष आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, सातारा जिल्हा बँकेचा सहकारी बँकिंग क्षेत्रात महाराष्ट्रातच नव्हेतर देशातही नावलौकिक असून जिल्हयामध्ये ग्रामीण व कृषी क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावत आहे. जागतिकीकरण व आधुनिकीकरणामुळे राष्ट्रीयकृत व खाजगी बँकाप्रमाणेच सातारा जिल्हा बँक ग्राहकांना तत्पर व गुणात्मक सेवा देणेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत. ग्रामीण तसेच शहरी भागातील शेतकरी व ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले, बँकेने ग्राहकांना २०१३ मध्ये डिजिटल बँकिंग सेवा देणेस सुरुवात केलेली असून यामध्ये काळानुरुप झालेले बदलानुसार ग्राहकांना आधुनिक बँकिंगच्या सर्व सेवा देणेचा प्रयत्न केला आहे. सातारा जिल्हा बँक ही महाराष्ट्रातील नावलौकिक प्राप्त बँक असून ग्राहकांना डिजिटल सेवा देणेमध्ये अग्रेसर आहे. ग्राहकांना आधुनिक बँकिंगच्या सेवा उपलब्ध होणेसाठी व स्पर्धात्मक युगामध्ये मागे न राहता राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकांच्या बरोबरीने बँकेने नेहमीच गुणात्मक व तत्पर डिजिटल सेवा ग्राहकांना उपलब्ध करुन दिलेली आहे. सातारा जिल्हा बँकेने शेतकरी सभासद व ग्राहकांसाठी विविध योजना कार्यान्वित केलेल्या असून ग्राहक व शेतकरी सभासदांना त्याचा चांगला लाभ होत आहे.
यासंबंधी अधिक माहितीसाठी बँकेचे हेल्पलाईन नंबर 18002331245 /02162-236036 या क्रमांकावर संपर्क साधावा. बँकेच्या ग्राहकांनी नजिकच्या शाखेत संपर्क साधून बँकेच्या रूपे डेबिट कार्ड, किसान क्रेडीट कार्ड, युपीआय,किसान एम–पे अॅप (मोबाईल बँकिंग), ऑनलाईन बँकिंग, भारत बिल पेमेंट सिस्टीम, आरटीजीएस/एनईएफटी इत्यादी सेवा-सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन बँकेचे अध्यक्ष आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र सरकाळे यांनी केले आहे.