चार दिवसांपूर्वी मायणी येथे सराफाच्या दुकानात घुसून पिस्टलचा धाक दाखवत सोने लुटण्याचा प्रयत्न करणारी टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने (एलसीबी) गजाआड केली. संशयित आरोपी म्हसवड जि.सातारा व सांगली येथील असून त्यातील एकजण सराफ असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सातारा : चार दिवसांपूर्वी मायणी येथे सराफाच्या दुकानात घुसून पिस्टलचा धाक दाखवत सोने लुटण्याचा प्रयत्न करणारी टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने (एलसीबी) गजाआड केली. संशयित आरोपी म्हसवड जि.सातारा व सांगली येथील असून त्यातील एकजण सराफ असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, एलसीबी पथकाने गुजरातमध्ये जावून ही कारवाई केली असल्याची माहिती पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली.
आकाश सुखदेव जगताप (म्हसवड), अंकुश उर्फ दिपक संभाजी यादव (रा.बस्तवडे ता.तासगाव, जि.सांगली), मधुसूदन संदीपकुमार पारीक (रा.म्हसवड, जि.सातारा) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. 7 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता मायणी येथील बालाजी ज्वेलर्सच्या दुकानात घुसून दुकानदार अमित माने पिस्टलचा धाक दाखवून ‘माल दे,’ अशी दमदाटी करत सोन्याचे दुकान लुटण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांच्या दुर्देवाने चोरीचा हा प्रयत्न फसला व तेथून ते पसार झाले. मात्र या घटनेमुळे परिसर भितीच्या छायेखाली गेला. मायणी बाजारपेठेत खळबळ उडाली.
वडूज पोलिस गुन्हा दाखल झाल्यानंतर एलसीबीने तपासाला सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेज असल्याने त्यावरुन त्यातील एक संशयित हा आकाश जगताप असल्याचे समोर आले. एलसीबीने त्याचा शोध घेण्यास सुरुवात केल्यानंतर तो अहमदाबाद, गुजरात राज्यात असल्याचे समोर आले. त्यानुसार एलसीबीचे एक पथक गुजरातमध्ये गेले व त्याला तेथून ताब्यात घेतले. संशयित आरोपीकडे अधिक चौकशी असता त्याने इतर साथीदारांची नावे सांगितली. तसेच घटनेत वापरलेल्या हत्याराचीही माहिती दिली.
एलसीबीने तपासाला फास आवळत आणखी दोन संशयितांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्टल, दोन जिवंत काडतुसे, एक एअर पिस्टल व फटाके वाजवण्याचे खेळण्यातील पिस्टल असा 81 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. एलसीबी पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल तीन संशयितांचा ताबा वडूज पोलिसांकडे दिला.
पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधीक्षक अजित बोर्हाटे, पोनि किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रमेश गर्जे, सपोनि आनंदसिंग साबळे, फौजदार गणेश वाघ यांच्यासह एलसीबी पोलिसांनी कारवाई सहभाग घेतला.