फलटण प्रतिनिधी :
ज्ञानविकास मंडळ सातारा यांच्यातर्फे दरवर्षी देण्यात येणारा आदर्श माता पुरस्कार यावर्षी फलटण येथील पत्रकार विजय भिसे यांच्या मातोश्री सौ. रंजना मोहन भिसे यांना जाहीर झाला आहे. सौ. रंजना भिसे यांनी आपल्या मुलांबरोबर, दिरांची मुले यांनाही शिक्षणाचे महत्व लक्षात घेऊन अतिशय गरीब परिस्थितीत शिक्षित केले.
सौ. भिसे यांनी आपल्या आई - वडिलांची परिस्थिती हलाखीची असल्याने लहान भावांना शिक्षणासाठी आधार दिला व त्यांना घडवले. एक पिढी सशक्त घडण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. सौ. रंजना भिसे यांनी स्वतः अपार कष्ट करून मेहनतीने संसार करीत मुले घडवली व समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे. त्यामुळे त्यांची आदर्श माता म्हणुन निवड करण्यात आली आहे.
खडतर परिस्थितीत जीवन जगून आपल्या मुलांना शिक्षण देऊन त्यांच्यावर चांगले संस्कार केलेल्या आदर्श मातांना दरवर्षी सातारा येथील ज्ञान विकास मंडळाच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. मंडळाचे हे 35 वे वर्षे आहे. आजपर्यंत ज्ञानविकास मंडळाने सुमारे 160 मातांना आदर्श माता पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. आदर्श माता गौरव पुरस्कार कार्यक्रम गुरुवार दिनांक 11 एप्रिल 2024 रोजी महिला मंडळ सभागृह, गांधी मैदान (राजवाडा) सातारा येथे सायंकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी संपन्न होणार आहे. या पुरस्काराबद्दल सौ.रंजना भिसे यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.