सातारा दि. 11 : शहरी भागातील लोकांमध्ये रानभाज्यांची जनजागृती करण्यासाठी तसेच रानभाज्यांचे महत्व प्रसारीत करण्यासाठी व विपणन साखळी निर्माण करण्याकरिता कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापान (आत्मा) अंतर्गत सोमवार दि. 15 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11 वाजता हॉटेल लेक व्हियू, सातारा याठिकाणी रानभाजी महोत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवामध्ये विविध प्रकारच्या रानभाज्यांची माहिती प्रचार व प्रसिध्दी , प्रदर्शन तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे उपालब्ध असणाऱ्या रानभाज्या शेतकऱ्यांकडुन थेट ग्राहकांपर्यंत विक्री करण्यात येणार आहेत असे, प्रकल्प संचालक आत्मा, सातारा यांनी कळविले आहे.
मानवी आरोग्यामध्ये सकस अन्नाचे अनन्यसाधारण महत्व आहे. रानातील म्हणजेच जंगलातील तसेच शेतशिवारातील नैसर्गिकरित्या उगवलेल्या रानभाज्यांचे, रानफळांचे महत्व व आरोग्य विषयक माहिती सर्वसामान्य नागरिकांना होणे आवश्यक आहे. निसर्गामध्ये उपलब्ध रानभाज्या , फळांची माहिती शहरातील नागरिकांना मिळून विक्री व्यवस्था झाल्यास त्याच्या विक्रीतून शेतकऱ्यांनाही काही आर्थिक फायदा होईल. तसेच रानभाज्या नैसर्गिकरित्या येत असल्यामुळे त्यावर रासायनिक किटकनाशक, बुरशीनाशक फवारणी करण्यात येत नाही.