फलटण प्रतिनिधी :
विडणी (ता. फलटण) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपच्या मनीषा दीपक नाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. दरम्यान अडीच वर्षांपूर्वी सरपंच पदाच्या थेट निवडणुकीमध्ये माझा विजय झाला. मात्र विरोधी गटाकडे तेरा सदस्य होते. सरपंच पदाची खुर्ची खाली करण्याच्या नादात ग्रामपंचायत मध्ये कट कारस्थान केल्यामुळे विभागीय आयुक्त पुणे यांनी 13 पैकी 9 सदस्यांना अपात्र ठरविले व त्यांचे कारस्थान त्यांच्यावरच उलटल्याने बहुमतातील लोकनेता तोंडावर पडल्याचे टीकास्त्र डॉ. बाळासाहेब शेंडे यांचे नाव नघेता सरपंच सागर अभंग यांनी सोडले. ग्रामपंचायत च्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या विकास कामांमध्ये बाधा येत होती मात्र आता उपसरपंच पद भाजपकडे असल्यामुळे गावचा विकास केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास यावेळी सरपंच सागर अभंग यांनी बोलून दाखविला.
विडणी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची आज निवड करण्यात आली. यामध्ये भाजपप्रणीत विडणी विकास आघाडीच्या मनीषा नाळे यांची निवड करण्यात आली. दरम्यान, शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या उपसरपंचांसह नऊ सदस्य अपात्र ठरल्यामुळे राजे गटाच्या वतीने उपसरपंचपदासाठी एकही अर्ज दाखल केला नसल्याने मनीषा नाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडणूक अधिकारी म्हणून मंडलाधिकारी कैलास जाधव व ग्रामविकास अधिकारी अंकुश टेंबरे यांनी काम पाहिले. निवडीबदल मनीषा नाळे यांचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार सचिन पाटील, सरपंच सागर अभंग, चंद्रकांत नाळे, किसनराव टिळेकर, केशवराव नाळे, शरद नाळे, नंदकुमार अभंग, तसेच सदस्य व ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले.