हर घर तिरंगा अभियानासाठी जिल्हा परिषद समन्वय संस्था असणार आहे. दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांच्या घरावर तसेच सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर तिरंगा झेंडा स्वयंस्फूर्तीने फडकविणे अपेक्षित आहे
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या
स्मृती जागृत रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील ज्ञात, अज्ञात क्रांतीकारकांच्या कार्याची प्रेरणा जनमानसात
निर्माण व्हावी यासाठी " स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त " 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत प्रत्येकांच्या घरावर, शासकीय कार्यालयांवर तिरंगा झेडा फडकविण्यात येणार आहे. हा अमृत महोत्सावाचा गौरव सोहळा संपूर्ण देशभर आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे.
असा असणार आहे हर घर तिरंगा उपक्रम
हर घर तिरंगा अभियानासाठी जिल्हा परिषद समन्वय संस्था असणार आहे. दिनांक 13 ऑगस्ट ते 15
ऑगस्ट 2022 या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांच्या घरावर तसेच सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर तिरंगा झेंडा स्वयंस्फूर्तीने फडकविणे अपेक्षित आहे. 13 ते 15 ऑगस्ट या दरम्यान ‘घरोघरी तिरंगा’ अभियानात सहभागी होण्यासाठी आपल्या राष्ट्रध्वजाची मागणी ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, स्वस्त धान्य दुकान, पोस्ट ऑफीस यांच्याकडे नोंदवू शकता किंवा इतर ठिकाणावरुनही राष्ट्रध्वज खरेदी करु शकता. राष्ट्रध्वज कुठल्याही परिस्थितीत फाटलेला, मळलेला अथवा चुरगळलेला वापरु नये. तिरंगा फडकवताना नेहमी केसरी रंग वरच्या बाजूने व हिरवा रंग खालच्या बाजूने राहील याची दक्षता घ्यावी. ‘घरोघरी तिरंगा हा उपक्रम साजरा करण्याबाबत मार्गदर्शक आणि सर्वसाधारण सूचना सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या mahaamrut.org/Download. aspx व mahaamrut.org या वेबसाईटवर उपलब्ध करुन दिलेल्या आहेत.
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस यंत्रणा, शाळा व महाविद्यालये, परिवहन, आरोग्य केंद्रे, स्वस्त धान्य दुकाने, सहकारी संस्था अशा सर्वसामान्य नागरिकांशी निगडीत यंत्रणांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. स्वातंत्र्यानंतर देश सातत्त्याने स्वावलंबनाच्या मार्गावर पुढे जात आहे. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त सुरु झालेला ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ हे स्वावलंबनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. हा उपक्रम 15 ऑगस्ट 2023 पर्यंत साजरा करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे.
13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत घराघरावर तिरंगा डौलाने फडकवूया- - जिल्हाधिकारी
भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात सातारा जिल्ह्याचे अतुलनीय योगदान आहे. या योगदानाबद्दल आपण
सदैव कृतज्ञ राहिले पाहिजे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार यावर्षी 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा उपक्रम जिल्ह्यात आपण उत्साहात साजरा करूया. तीन दिवस घराघरावर तिरंगा डौलाने फडकवूया हे करत असताना ध्वजसंहिता पाळूया; राष्ट्रध्वजाचा सन्मान करा, असे आवाहन जिल्हाधिकारी पुणे डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी,सातारा रुचेश जयवंशी आणि जिल्हाधिकारी सोलापूर मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.
विविध कार्यक्रमांचे आयोजन
पुणे विभागात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत हुतात्मा स्मारक सुशोभीकरण, जिल्ह्याच्या
ठिकाणी तिरंगा बलून सोडणे, प्रभात फेरी, जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी 75 फूट उंचीचा राष्ट्रध्वज
उभारण्यात येणार आहे. सायक्लोथॉन मॅरेथॉन, वारसास्थळ पदयात्रा, सांस्कृतिक कार्यक्रम, कार्यालयांची
स्वच्छता यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक,
क्रांतिकारक स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी जनमानसात रहावी या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी दि. 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2022 हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रत्येकाने सहभाग घ्यावा, असे आवाहन सातारा, पुणे व सोलापूर जिल्हा प्रशासनाने तर्फे करण्यात आले आहे.
संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, सातारा