भारत निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र शासन विधी व न्याय विभाग यांच्याद्वारे निवडणूक कायदा (सुधारणा) अधिनियम 2021 अन्वये लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950 मध्ये सुधारणा केल्या आहेत. त्या अनुषंगाने मतदार नोंदणी नियम 1960 मध्ये देखील सुधारणा करण्यात आल्या आहेत.
सातारा दि. 17: भारत निवडणूक आयोगाने दि. 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे.
राज्यात आगामी वर्षाच्या 1 जानेवारी या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सर्वसाधारणपणे चालू वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत जाहीर करण्यात येतो. आगामी वर्षाच्या जानेवारीच्या पहिल्या आठवडयात मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करण्यात येते. तथापि, भारत निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र शासन विधी व न्याय विभाग यांच्याद्वारे निवडणूक कायदा (सुधारणा) अधिनियम 2021 अन्वये लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950 मध्ये सुधारणा केल्या आहेत. त्या अनुषंगाने मतदार नोंदणी नियम 1960 मध्ये देखील सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यानुसार चार अर्हता दिनांक अनुक्रमे 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै, व 1 आक्टोंबर उपलब्ध झाल्या आहेत. दि. 1 जानेवारी या अर्हता दिनांकावर आधारित वार्षिक पुनरीक्षण कार्यक्रम घेण्यात येईल. प्रारुप मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतर दि. 1 जानेवारी या अर्हता दिनांकावर नोंदणीसाठी पात्र असलेले अर्जदार आणि त्यापुढील 1 एप्रिल, 1 जुलै, व 1 आक्टोंबर या अर्हता दिनांकावर नोंदणीसाठी पात्र असलेले अर्जदार आगाऊ अर्ज सादर करु शकतील.
दि. 1 जानेवारी या अर्हता दिनांकावर आधारित प्राप्त पात्र मतदारांच्या अर्जावर पुढे दिलेल्या वेळापत्रकानुसार कार्यवाही करुन अंतिम प्रकाशनासह मतदार यादी अद्ययावत करण्यात येईल. तसेच जे अर्ज पुढील तीन अर्हता दिनांकावर विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम कालावधीत आणि निरंतर पुनरीक्षणाच्या काळामध्ये आगाऊ प्राप्त झाले आहेत त्यावर निरंतर पुनरीक्षणच्या काळात मतदार नोंदणी अधिकारी यांच्याद्वारा संबंधित तिमाहीमध्ये शक्यतो तिमाहीच्या पहिल्या महिन्यात कार्यवाही करण्यात येईल.
दि.1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा वार्षिक विशेष पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. सदर वार्षिक विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचे सविस्तर वेळापत्रक पुढीलप्रमाणे -
पूर्व- पुनरिक्षण उपक्रम - 1. मतदान केंद्राचे सुसूत्रिकरण व प्रमाणिकरण करणे, दुबार / समान नोंदी, एकापेक्षा अधिक नोंदी, तार्किक त्रुटी दुर करणे इ., आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करुन मतदार यादीत सुधारणा करणे, विभाग /भाग यांची आवश्यकतेनुसार नव्याने मांडणी करुन् मतदार केंद्राच्या सीमांचे पुर्नरचना तयार करुन् मतदान केंद्राच्या यादीला मान्यता घेणे, तुलनात्मक फरक शोधून फरक दूर करण्यासाठी कालबध्द योजना आखणे- दि.4 ऑगस्ट 2022 (गुरुवार) ते 24 आक्टोंबर 2022 (सोमवार).
2. नमुना 1-8 तयार करणे, दि. 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित पुरवणी
व एकत्रित प्रारुप यादी तयार करणे - दि. 25 आक्टोंबर 2022 (मंगळवार ) ते दि.07 नोव्हेंबर 2022 (सोमवार)
पुनरिक्षण उपक्रम - 3. एकत्रिकृत प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करणे- दि. 9 नोव्हेंबर 2022 (बुधवार ).
4. दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी - दि. 9 नोव्हेंबर 2022 (बुधवार) ते 08 डिसेंबर 2022 (गुरुवार ).
5. विशेष मोहिमांचा कालावधी - दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीत मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी निश्चित केलेले दोन शनिवार व रविवार.
6. दावे व हरकती निकालात काढणे - दि. 26 डिसेंबर 2022 (सोमवार ) पर्यत.
7. अंतिम प्रसिध्दीसाठी आयोगाची परवानगी मागणे, डाटाबेस अद्यावत करणे आणि पुरवणी याद्यांची छपाई करणे - दि. 3 जानेवारी 2023 (मंगळवार ) पर्यन्त
8. मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करणे - दि. 5 जानेवारी 2023 (गुरुवार )
तरी सदर कार्यक्रमाचे अनुषंगाने सातारा जिल्हयातील 18 वर्षावरील सर्व नागरिकांनी आपले नांवाची मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करावी असे आवाहन उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी निता सावंत-शिंदे यांनी केले.