सातारा शहरात पारंपारिक पध्दतीने पण साधेपणाने सीमोल्लंघनाचा कार्यक्रम पार पडला. खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारकरांना दसर्याच्या शुभेच्छा देत मानाच्या भवानी तलवारीचे पूजन केले.
सातारा : सातारा शहरात पारंपारिक पध्दतीने पण साधेपणाने सीमोल्लंघनाचा कार्यक्रम पार पडला. खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारकरांना दसर्याच्या शुभेच्छा देत मानाच्या भवानी तलवारीचे पूजन केले.
सातार्याच्या शाही दसर्याची महाराष्ट्रात मोठी शान आहे. सातार्याच्या राजघराण्यातील मंडळी पोवई नाक्यावर येऊन सीमोल्लंघन करत सोने लुटतात, अशी परंपरा आहे. या पारंपारिक सोहळ्याला कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आले. काल खासदार उदयनराजे भोसले यांनी भवानी मातेची व भवानी तलवारीचे पूजन केले. यावेळी जल मंदिर पॅलेसवर राजघराण्यातील निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या विधिवत पूजनानंतर उदयनराजे यांनी कोरोनाचे विघ्न हटू दे आणि ऐश्वर्य आणि समृद्धी सर्वत्र नांदू दे, असे साकडे भवानी मातेला घालत सर्व सातारकरांना विजया दशमीच्या शुभेच्छा दिल्या. सातार्याची भरभराट आणि समृध्दता हेच आपले उद्दिष्ट असल्याचे उदयनराजे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. त्यानंतर उदयनराजे यांनी पोवई नाक्यावर येऊन सीमोल्लंघन केले. येथील शिवतीर्थावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केले. यावेळी सातारकरांनी एकमेकांना आपट्याची पाने देत सोने लुटण्याचा आनंद घेतला.