फलटण प्रतिनिधी- अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस फलटण शहर शाखेच्या माध्यमातून फलटण नगर परिषद सफाई कामगार, मेहतर कामगार दि. ९ ऑगस्ट क्रांतीदिनी आपल्या विविध प्रलंबीत मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आपले काम बंद ठेवून एक दिवसाच्या लाक्षणिक संपावर जाणार होते मात्र मा. उपायुक्तसो, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई यांनी सफाई कामगार व वाल्मिकी समाजाचे प्रलंबीत प्रश्नांवर सकारात्मक चर्चा केली असुन मागण्यापुर्ण करणेकामी आश्वासन दिलेले आहे. त्यामुळे सदरचे आंदोलन मागे घेत असल्याचे संघटनेच्या वतीने सातारा जिल्हाउपाध्यक्ष राजू मारुडा यांनी एका प्रसिद्धी पत्रकार द्वारे कळविले.
यावेळी संघटनेचे फलटण शहर अध्यक्ष मनोज मारुडा, शहर सचिव नितीन वाळा, फलटण शहर महामंत्री लखन डांगे, खजिनदार निखिल वाळा यांच्यासह अन्य पदाधिकारी व स्त्री – पुरुष कर्मचारी उपस्थित होते.
अखिल भारतीय सफाई मजदुर काँग्रेसच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नगर परिषद, महानगरपालिका, शासकीय व निमशासकीय कार्यालयातील सफाई कामगार, मेहतर वाल्मिकी समजाजाचे प्रलंबीत प्रश्न निकाली काढण्यासाठी आणि दि. २४ फेब्रुवारी २०२३ रोजीचे निर्गमित शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्यासाठी आझाद मैदान मुंबईयेथील दि. ७ जून २०२३ रोजी धरणे आंदोलनात उपस्थित राहुन मंत्री ना. दादाजी भुसे यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी या मागणीसाठी हे एकदिवसीय बंद आंदोलन करण्यात येणार होते.