सातारा दि.16: कोविड-19 मुळे कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन होऊन विधवा झालेल्या महिला तसेच कोविड मुळे पालक गमावलेल्या बालकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासन आपल्या दारी या संकल्पनेवर आधारित मिशन वात्सल्य या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कोरेगाव येथील शिवरत्न सांस्कृतिक भवन येथे पालक मार्गदर्शन व मदत सभा संपन्न झाली.
पालक मार्गदर्शन व मदत सभा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, सातारा युनिसेफ प्रेरणा संस्था, मुंबई, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बाल विकास प्रकल्प अधिकारी, ग्रामीण, कोरेगाव संरक्षण अधिकारी कोरेगाव यांच्या सहकार्यातून आयोजित करण्यात आली होती. या सभेस जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व्हि.ए. तावरे, युनिसेफच्या राज्य सल्लगार डॉ. सरिता शंकरन, बाल रोग तज्ञ डॉ. चित्रा दाभोळकर, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा ॲङ सुचित्रा घोगरे-काटकर, योगेंद्र सातपुते, आयडीबायचे संचालक प्रशांत पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. दाभोळकर यांनी उपस्थित महिलांना त्यांचे आरोग्य कसे सांभाळावे याचबरोबर बालकांचे संगोपन कसे करावे, बालकांच्या आरोग्याची काळजी कशा प्रकारे घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले.
तावरे यांनी कोविड मुळे दोन्ही पालक गमावलेल्या एकूण 25 बालकांना राज्य शासनाकडून 5 लाख व PM Children या योजनेून 10 लाख रुपये इतका आर्थिक लाभ देण्यात आल्याचे सांगितले. तसेच महिला व बाल विकास विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली.