फलटण प्रतिनिधी :
राज्यामध्ये प्रतिवर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दि. ३१ ऑक्टोबर या जन्मदिवसाचे औचित्य साधून केंद्रीय दक्षता आयोग व महाराष्ट्र शासनातर्फे दक्षता जनजागृती सप्ताहाचे (Vigilance Awareness Week) आयोजन करण्यात येते. यावर्षी दिनांक २७/१०/२०२५ ते दिनांक ०२/११/२०२५ या दरम्यान हा सप्ताह राज्यभर साजरा होत आहे. या सप्ताहाकरिता यावर्षी 'दक्षता-आपली सामायिक जबाबदारी' ही महत्त्वपूर्ण संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. या निमित्ताने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (Anti Corruption Bureau - ACB), जिल्हा सातारा कार्यालयाने सातारा जिल्ह्यातील नागरिकांना शासकीय कार्यालयांमध्ये लोकसेवकांकडून होणाऱ्या लाच मागणीच्या विरोधात निर्धास्तपणे तक्रारी करण्यासाठी पुढे येण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे.
ए.सी.बी. आपल्या दारी' उपक्रम:
सातारा शहरापासून दूर असलेल्या आणि दुर्गम भागातील नागरिकांची तक्रार देण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी येण्याची गैरसोय टाळण्यासाठी विभागाने 'ए.सी.बी. आपल्या दारी' ही संकल्पना अंमलात आणली आहे. नागरिकांनी केवळ संपर्क क्रमांकावर संपर्क साधल्यास, विभाग त्यांच्या मागणीनुसार त्यांच्याच ठिकाणी येऊन तक्रारीची दखल घेईल व कायदेशीर कारवाई करेल. यामुळे नागरिकांचा प्रवासाचा वेळ आणि खर्च वाचणार आहे.
तक्रारदाराची ओळख गुप्त ठेवणारः
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने स्पष्ट केले आहे की, त्यांच्याकडे तक्रार देणाऱ्या नागरिकाचे नाव संपूर्णपणे गुप्त ठेवण्यात येते. तसेच, शासकीय कार्यालयातील तक्रारदाराचे कायदेशीर काम प्रलंबित राहणार नाही यासाठी विभाग पाठपुरावा करेल.
भ्रष्टाचार मुक्त समाजासाठी सक्रिय सहभाग आवश्यक :
भ्रष्टाचार मुक्त समाज केवळ नागरिकांच्या सक्रिय सहभागानेच शक्य आहे. लाचखोर व्यवस्थेविरोधात निडरपणे उभे राहणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा यांनी केले आहे. समाजाला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी, विकासाला गती देण्यासाठी आणि जनतेची आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा यांना सहकार्य करावे.
सातारा जिल्ह्यातील कोणत्याही शासकीय कार्यालयात कोणत्याही लोकसेवकाने किंवा खाजगी इसमाने शासकीय काम करून देण्यासाठी किंवा काम केल्याच्या मोबदल्यात शासकीय फी व्यतिरिक्त किंवा इतर कोणत्याही स्वरूपात लाचेची मागणी केल्यास, नागरिक खालील
संपर्क क्रमांकांवर तक्रार देऊ शकतात :
टोल फ्री क्रमांक: १०६४
व्हॉट्सअप मोबाईल क्रमांक: ७०५७५७१०६४ मोबाईल क्रमांकः ९५९४५३११०० किंवा ९७६३४०६५०० लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा कार्यालयाचा दूरध्वनी क्र.: ०२१६२ २३८१३९
नागरिक थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा कार्यालयात समक्ष येऊनही तक्रार दाखल करू शकतात. योग्य दखल घेऊन लाचखोर लोकसेवकाविरुद्ध कडक कारवाई केली जाईल आणि तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे विभागाने स्पष्ट केले आहे.



















