फलटण | प्रतिनिधी :
संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यानिमित्त फलटण येथे मुक्कामी आलेल्या वारकऱ्यांच्या आरोग्यसेवेसाठी राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ, फलटण व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत दवाखान्याचे आयोजन करण्यात आले होते.
शुक्रवार, दि. १७ जुलै रोजी संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याच्या फलटण मुक्कामादिवशी या मोफत दवाखान्यास सुरुवात करण्यात आली. डॉ. सुभाष गुळवे व त्यांच्या सहकाऱ्यांनी वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करून आवश्यक औषधोपचार व औषधांचे मोफत वाटप केले. या उपक्रमाचा हजारो वारकऱ्यांनी लाभ घेतला.
या सेवाभावी उपक्रमाला सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, बिल्डर असोसिएशन फलटण सेंटरचे माजी अध्यक्ष प्रमोद निंबाळकर, अनिल शिरतोडे, कुचेकर, करगे राजाभाऊ मदने, तेजस मदने यांनी भेट देऊन आयोजकांच्या कार्याचे कौतुक केले.
वारकरी सेवेला सर्वोच्च प्राधान्य देत आयोजित करण्यात आलेल्या या मोफत दवाखान्यामुळे पालखी सोहळ्यात सहभागी भाविकांना मोठा दिलासा मिळाला. आयोजकांनी भविष्यातही अशाच सामाजिक व सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्धार व्यक्त केला











