परराज्यातील अल्पवयीन मुलांना रोजगाराच्या नावाखाली आणून त्यांचे शोषण होत असेल, तर अशा मुलांची तात्काळ सुटका करून त्यांचे पुनर्वसन करावे आणि दोषी आढळणाऱ्या हॉटेल व ढाबा मालकांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
फलटण प्रतिनिधी :
फलटण शहर व परिसरातील काही हॉटेल आणि ढाब्यांमध्ये अठरा वर्षांखालील मुलांकडून काम करून घेतले जात आहे. विशेषतः फलटण-पंढरपूर रोडवरील काही ढाब्यांवर परराज्यातून आणलेल्या अल्पवयीन मुलांकडून दीर्घकाळ काम करून घेतले जात असल्याचे बोलले जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काही ठिकाणी ही मुले सकाळपासून रात्री उशिरापर्यंत म्हणजेच १२ ते १५ तास काम करत असल्याचे दिसून येत आहे. तसेच काही मुलांना प्रसंगी मारहाण व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याच्याही चर्चा आहेत. या मुलांच्या राहण्याची, शिक्षणाची आणि आरोग्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचेही बोलले जात आहे.
बालमजुरी ही कायद्याने दंडनीय बाब असून अल्पवयीन मुलांकडून धोकादायक अथवा दीर्घकाळ काम करून घेणे हा गंभीर गुन्हा मानला जातो. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन वस्तुस्थितीची चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून होत आहे.
विशेषतः परराज्यातील अल्पवयीन मुलांना रोजगाराच्या नावाखाली आणून त्यांचे शोषण होत असेल, तर अशा मुलांची तात्काळ सुटका करून त्यांचे पुनर्वसन करावे आणि दोषी आढळणाऱ्या हॉटेल व ढाबा मालकांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.











