भारतीय संघाच्या या ऐतिहासिक यशामुळे देशासह महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल झाले असून कर्णधार लखन मोरे यांच्या नेतृत्वाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
फलटण प्रतिनिधी :
नेपाळची राजधानी काठमांडू येथे पार पडलेल्या पहिल्या साऊथ एशियन सॉफ्ट हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय पुरुष सॉफ्ट हॉकी संघाने पाकिस्तानचा अंतिम सामन्यात ७-० असा दणदणीत पराभव करून ऐतिहासिक विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व महाराष्ट्राचे सुपुत्र लखन नंदकुमार मोरे यांनी कर्णधार म्हणून यशस्वीपणे केले. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत दक्षिण आशियातील सर्वोच्च मानाचा किताब आपल्या नावावर केला.
या अभूतपूर्व यशाबद्दल भारतीय संघाचे कर्णधार लखन नंदकुमार मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाच्या वतीने समूहाचे संचालक तथा युवा उद्योजक मा. सचिन यादव यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी लखन मोरे यांच्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यात आला तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी बोलताना सचिन यादव यांनी सांगितले की, “खेळ हा केवळ स्पर्धेचा विषय नसून शिस्त, समर्पण, नेतृत्व आणि देशभक्तीची भावना विकसित करणारे प्रभावी माध्यम आहे. लखन मोरे यांनी भारतीय संघाचे नेतृत्व करत देशाला अभिमानास्पद यश मिळवून दिले आहे. त्यांचा हा प्रवास युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे.”
के. बी. उद्योग समूह सामाजिक बांधिलकी जपत शिक्षण, सामाजिक कार्य, कला, संस्कृती आणि क्रीडा क्षेत्रातील गुणवंतांना सातत्याने प्रोत्साहन देत आहे. विविध खेळांमध्ये प्राविण्य मिळवणाऱ्या खेळाडूंना आर्थिक व नैतिक पाठबळ देऊन त्यांचा उत्साह वाढविण्याचे कार्यही समूहामार्फत केले जाते.
भारतीय संघाच्या या ऐतिहासिक यशामुळे देशासह महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल झाले असून कर्णधार लखन मोरे यांच्या नेतृत्वाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. उपस्थितांनी भारतीय संघाचे आणि लखन मोरे यांचे अभिनंदन करून भविष्यातही देशासाठी अशीच गौरवास्पद कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
विशेष म्हणजे, सॉफ्ट हॉकी हा पूर्णपणे भारतात विकसित झालेला खेळ असून त्याचा प्रसार दक्षिण आशियाई देशांमध्ये वेगाने वाढत आहे. या पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपद मिळवत भारताने या खेळातील आपले वर्चस्व अधोरेखित केले आहे.


















