फलटण प्रतिनिधी :
सातारा वनविभाग (प्रादेशिक), सामाजिक वनीकरण विभाग सातारा आणि सह्याद्री व्याघ्र राखीव (व्याघ्रजीव) कराड, कुंडल वन अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली 'हरित वारी वृक्षदिंडी' उत्साहात पार पडली. सन २०१९ पासून सुरू झालेल्या या उपक्रमाचे यंदाचे सातवे वर्ष असून, पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले.
तारडगाव येथे या वृक्षदिंडीचा शुभारंभ मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) कोल्हापूर श्रीमती शैलक्ष्मी ए. यांच्या हस्ते झाला. यावेळी उपवनसंरक्षक सातारा अमोल सातपुते, उपवनसंरक्षक प्रादेशिक सांगली सागर गवते, उपवनसंरक्षक प्रादेशिक सावंतवाडी मिलिंद शर्मा यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि सुमारे ३५० वनाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तारडगाव ते सुरवडी या सुमारे १४ किलोमीटर मार्गावर पायी वृक्षदिंडी काढून वनसंरक्षणाबाबत जनजागृती करण्यात आली.
यंदाच्या उपक्रमात 'हरितवारी वन' या नावाने नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्यात आली. मौजे काळज येथे एकूण ३७५ पौराणिक व धार्मिक महत्त्वाच्या वृक्षप्रजातींची लागवड करण्यात आली. यामध्ये पिंपळ, वड, उंबर, बेल, आवळा, चाफा आदी वृक्षांचा समावेश आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग हिरवागार करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी वारकऱ्यांना ५० हजार सीडबॉल्स तसेच विविध जंगली प्रजातींचे बियाणे वाटप करण्यात आले. पंढरपूरकडे जाताना रस्त्याच्या कडेला ही बियाणे रुजविण्याचे आवाहन करण्यात आले. यासोबतच वनविभागाच्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या पुस्तिकांचेही वितरण करण्यात आले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहाय्यक वनसंरक्षक दिगंबर जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी निकिता बोटेकर, विजय रामटेके तसेच फलटण येथील वनरक्षक व वनपाल यांनी विशेष परिश्रम घेतले.











