फलटण, प्रतिनिधी (दि. १७) :
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांच्या सेवेसाठी संत शिरोमणी नरहरी महाराज सर्व शाखीय हिंदू सुवर्णकार समाज संस्था, श्री क्षेत्र फलटण यांच्या वतीने सेवाभावी उपक्रमांतर्गत वारकऱ्यांना बिस्कीट वाटप करण्यात आले.
छत्रपती शिवाजी वाचनालयासमोर आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात पायी वारी करणाऱ्या हजारो वारकऱ्यांना बिस्कीटांचे वाटप करण्यात आले. वारीच्या प्रवासात वारकऱ्यांना क्षणभर विश्रांतीसोबत अल्पोपहार मिळावा आणि त्यांच्या सेवेत हातभार लागावा, या उद्देशाने संस्थेने हा उपक्रम राबविला.
संस्थेचे अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य तसेच महिला कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच उत्साहाने वाटपाची जबाबदारी सांभाळली. वारकऱ्यांनीही संस्थेच्या या सेवाभावी कार्याचे मनापासून स्वागत करत कौतुक व्यक्त केले.
यावेळी संस्थेचे पदाधिकारी, सदस्य व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. "वारी ही केवळ पायी चालण्याची परंपरा नसून सेवाभावातून भक्ती व्यक्त करण्याचे माध्यम आहे," या भावनेतून हा उपक्रम दरवर्षी अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचा संस्थेचा मानस असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.











