फलटण प्रतिनीधी -
फलटण ग्रामीण पोलिसांनी ट्रॅक्टर व दुचाकी चोरट्यांच्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला असून तिघा संशयतांना अटक करत एकुण ६४ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल ग्रामीण पोलिसांनी जप्त केला आहे.
फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातुन मिळालेल्या माहितीनुसार,१५ सप्टेंबर रोजी फिर्यादी विजय दिपक राजेपांढरे (रा. लक्ष्मीनगर, फलटण) यांच्या मालकीचा ६ लाख रुपये किंमतीचा महिंद्रा अर्जुन कंपनीचा ट्रॅक्टर सोमंथळी, ता. फलटण येथुन चोरी झाल्याची घटना घडली होती. फलटण तालुका व परिसरामध्ये ट्रॅक्टर चोरीच्या अनेक घटना सातत्याने घडत होत्या. पोलिसांनी केलेल्या तपासात अशी माहिती मिळाली की,संशयित आरोपींनी पहिल्यांदा चोरी करावयाच्या ट्रॅक्टरचे पार्किंगचे ठिकाण व ट्रॅक्टरची चोरी केल्यानंतर तो घेऊन जाण्याचा मार्ग याची रेकी करुन नंतर ट्रॅक्टरच्या चो-या केलेल्या आहेत.
त्या अनुषंगाने पोलिसांनी फलटण तालुक्यामध्ये अशा प्रकारच्या चो-या झालेल्या ठिकाणांवरील सी.सी.टी.व्ही कॅमेरे फुटेज व तांत्रिक माहितीचा अभ्यास करुन संशयित सुरज शंकर मदने (वय ३५) अनिकेत महेश जाधव (वय २० दोघेही राहणार सगोबाचीवाडी पणदरे ता बारामती)व राजेंद्र मारुती जाधव (वय ३० रा ढाकाळे) यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ट्रॅक्टर चोरीचे ७ व मोटार सायकल चोरीचा १ असे एकुण ८ गुन्हे उघडकीस आणून एकुण ६४ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल ग्रामीण पोलिसांनी जप्त केला आहे. संशयित सुरज शंकर मदने यांचा पुर्वेतिहास पडताळून पहाता चोरी, फसवणुक, पुरावा नाहीसा करणे, चोरीच्या उद्देशाने एकत्र जमणे अशा प्रकारच्या एकुण १८ गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग उघड झाला आहे.



















