गेले 31 वर्ष फलटण तालुक्यासह राज्यात राजकारणामध्ये सक्रिय असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व नव्यानेच भारतीय जनता पक्षाचे माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामध्ये विकास कामांमधून कलगीतुरा रंगताना फलटणमध्ये सध्या दिसत आहे.
दिल्ली व मुंबई येथे सत्तांतर झाले तरी आणि केंद्रातील अनेक मंत्री फलटणला येऊन गेले असले तरीही फलटण मध्ये कोणतेही सत्तांतर घडणार नाही, शहर माझ्या नियंत्रणामध्येच राहील व मीच फलटणचा विकास करणार असा विश्वास महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला. ते शुक्रवार पेठ फलटण येथे झालेल्या कार्यकर्ता मेळावा प्रसंगी बोलत होते.
यावेळी मा.नगरसेविका श्रीमती सुभद्राराजे नाईक निंबाळकर, माजी नगराध्यक्षा श्रीमती विद्याताई गायकवाड, सुनील मठपती, चंद्रकांत शिंदे मा.नगरसेवक, नितीन भैया भोसले मा. उपनगराध्यक्ष, भीमदेव बुरुंगले मा.नगरसेविका सौ.प्रगती कापसे, अनिल जाधव, सुदामराव मांढरे, मेघा सहस्त्रबुद्धे, संजय पालकर, पप्पू शेख, राहुल निंबाळकर, आहेरराव, यांच्या सह विविध मान्यवर या वेळी उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार श्रीमंत रामराजे म्हणाले की, निरा -देवघरचा व बारामतीकरांचा काडीमात्र संबंध नसून बारामतीला पाणी न्यायचे असते तर धरूनच होऊ दिले नसते असे सांगताना आपण आमदार असताना निरा देवघर चे भूमिपूजन केले असल्याचे आमदार रामराजे यांनी निदर्शनात आणून दिले.
फलटणच्या रेल्वेची खिल्ली उडविताना रामराजे म्हणाले कि रेल्वेमध्ये दोनच माणसे असतात एक पुढे व एक मागे तर मग आपण माणसं रेल्वेचे कौतुक किती वेळा सांगणार असा प्रश्न उपस्थित करून हिंदुराव वेगळे व्यक्तिमत्व होते असे सांगताना हिंदुराव हे राजकीय विरोधक असले तरी राजकारणात वैरी नव्हते मात्र खासदार हे शूद्र माणूस असल्याचे गंभीर वक्तव्य आमदारा रामराजे यांनी केले.
खासदारांकडून भांडले लावण्याचे काम सुरू असून आपापसातील भांडण मिटवा असे आवाहन आमदार रामराजे यांनी करतानाच नगरपालिकेतील चांगल्या कामांना स्थागिती आणणारे कार्यकर्तेच मंत्र्यांच्या कार्यक्रमात वारकरी बनून येतात ते रात्री काय करतात असा सवाल माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांचे नाव न घेता आ. रामराजे यांनी उपस्थित केला. दरम्यान नगरपालिका प्रशासन आजही माझेच ऐकते असे रामराजे म्हणाले.
नाईकबोमवाडी येथील होऊ घातलेल्या एमआयडीसी संदर्भात वक्तव्य करताना रामराजे म्हणाले की महामार्ग पासून शंभर किलोमीटर दूर असणाऱ्या ठिकाणी मोठे कारखानदार येऊ शकत नाहीत त्यामुळे उपळवे येथील साखर कारखाना तिथे हलवण्याचा सल्ला यावेळी आमदार रामराजे यांनी खासदार रणजितसिंह यांना दिला.
गेल्या पाच वर्षात 227 डीपी चोरीला गेले असून मागच्या सरकारकडून हे डीपी पुन्हा एकदा मिळाले असल्याचे सांगताना खासदार हे खोटं बोलत असल्याचे रामराजे यांनी सांगितले.
एक पंतप्रधान प्रचारासाठी कमी पडले तरी इंग्लंडचा पंतप्रधान आणला तरी फलटणची जनता ही आपल्याच बरोबर राहणार असल्याचा विश्वास आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.
पुढे बोलताना आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले की, 1991 साला पासून आपण फलटणला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनविण्याचे स्वप्न पाहिले आहे आणि मी ते स्वप्न पूर्ण करून दाखवणारच तर तालुक्यासाठी केलेल्या कामाचे फळ म्हणून येणाऱ्या निवडणुकीतील सत्ता माझ्या ताब्यात द्या असे भावनिक आवाहन आमदार रामराजे यांनी यावेळी केले.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शिक्षणावर पुन्हा एकदा निशाणा साधतानाच केंद्रातून 372 घटनेचे कलम काढून दाखवा असे आव्हान यावेळी रामराजे यांनी दिले.
75 व्या वाढदिवसाचे बक्षीस म्हणून मला फलटण नगरपालिकेची सत्ता हवी असल्याचे भावनिक आवाहन यावेळी आमदार रामराजे यांनी करतानाच आपण जर विरोधातील खासदार जरी झालो तर दिल्ली लुटून आणू त्याकरिता डोकं लागतं अशी उपहासात्मक टीका आमदार रामराजे यांनी केली.
खासदारांच्या शिक्षणाचा रामराजेंचा भाषणाचा मुद्दा
महाराष्ट्र विधान परिषदेचे मा.सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर गेल्या अनेक दिवसांपासून माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शिक्षणावरून टीकेची जोड उठवत आहेत. वरवर पाहता राजकीय उपहासात्मक टीका क्षणिक हास्याचा झरा खळखळत असला तरीही गेला 31 वर्षाच्या रामराजे नाईक निंबाळकर यांच्या राजकीय कारकीर्दीमध्ये फलटण तालुक्याला किती दृष्य विकासाचा फायदा झाला हा संशोधनचा विषय ठरत असून वास्तविक शिक्षण आणि कर्तुत्व याचा काडी मात्र संबंध नसतो हे इतिहासाने दाखवून दिले आहे. हे सर्व उच्चविद्याभूषितआ. रामराजे नाईक निंबाळकर यांना माहीत असूनही एवढा अट्टाहास कशासाठी अशी चर्चा सध्या फलटण तालुक्यामध्ये रंगू लागली आहे.