फलटण धैर्य टाईम्स :
श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण-मध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ ची सुरुवात प्रवेशोत्सव कार्यक्रमां-तर्गत प्रशालेच्या प्रवेशद्वारापासून प्रशालेत प्रवेश घेतलेल्या नवागतांचे व त्यांच्यासोबत आलेल्या पालकांचे स्वागत औक्षण करून ढोल ताशांच्या गजरात आनंदी व उत्साही वातावरणात करण्यात आले.
नवागत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक कुतूहल व पालकांच्या चेहऱ्यावर एक समाधानी वृत्ती दिसून आली. त्यांनी आपल्या पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी केलेली प्रशालेची निवड योग्य आहे, असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर पहावयास मिळाले.
कार्यक्रमाची सुरुवात सौ. एस. एम. तगारे व जी. बी. वाघ यांच्या स्वागतगीत गायनाने झाली. प्रशालेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रशालेचे प्रभारी प्राचार्य पी. डी. घनवट सर यांच्या हस्ते लेखणी देऊन व पालकांना वृक्ष व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
इयत्ता ५ वी ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ग्रंथालय प्रमुख अमरसिंह सूर्यवंशी बेडके यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत पाठ्यपुस्तक प्रशालेच्या-वतीने वाटप करण्यात आली.
प्रशालेमध्ये राबविण्यात येणाऱ्या गुरुजी AIR आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मोफत पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप, मोफत सायकल वाटप, एस. टी. पास योजना, विविध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, MHT-CET मार्गदर्शन केंद्र, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र विद्यार्थी पालक समुपदेशन केंद्र या विविध उपक्रमांची माहिती प्रा.एस. डी. यादव यांनी आपल्या मनोगतातून करून दिली.
कर्मयोगी कै. नामदेवराव सूर्यवंशी बेडके व कै. सुभाषराव सूर्यवंशी बेडके यांनी आपले पूर्ण जीवन शिक्षण कार्यासाठी वाहून घेतले. आधुनिक काळाप्रमाणे विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय सुलभरित्या निर्माण होण्यासाठी कै. सुभाषराव सूर्यवंशी बेडके यांनी अथक परिश्रम करून विविध कोर्सेस या संस्थेत सुरू केले आहेत.
संस्थेचे मानद सचिव डॉ. सचिन सूर्यवंशी बेडके व नियामक मंडळ सदस्य महेंद्र सूर्यवंशी बेडके यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची शैक्षणिक वाटचाल सुरू आहे.