फलटण | प्रतिनिधी
फलटण शहरातील काही हॉटेलमध्ये ग्राहकांची सर्रास आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. हॉटेलमध्ये जेवणानंतर शिल्लक राहिलेले अन्न ग्राहकांनी सोबत नेण्याची मागणी केल्यास त्यासाठी स्वतंत्र ‘पार्सल चार्ज’ आकारला जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
ग्राहकांनी आधीच अन्नाची पूर्ण किंमत भरलेली असताना, स्वतःच्या उरलेल्या अन्नासाठी वेगळा शुल्क आकारणे हा अन्यायकारक प्रकार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काही ठिकाणी तर पार्सलसाठी प्लास्टिक पिशवी च्या नावाखाली अवाजवी रक्कम वसूल केली जात असल्याचेही तक्रारी समोर आल्या आहेत.
“ग्राहकांनी उरलेले अन्न फेकू नये, अन्नाची नासाडी टाळावी, असा सल्ला दिला जातो. मात्र प्रत्यक्षात उरलेले अन्न नेण्यासाठी पैसे मोजावे लागतात, हा दुटप्पीपणा आहे,” अशी प्रतिक्रिया एका ग्राहकाने दिली.
या प्रकारामुळे हॉटेल व्यावसायिकांवर ‘अजब उद्योजक’ असा उपरोधिक शिक्का बसत असून, ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत ही बाब तपासली जावी, अशी मागणी होत आहे. ग्राहक संघटनांनी नगरपालिकेच्या अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि संबंधित विभागांनी याकडे लक्ष देऊन स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे लागू करावीत, तसेच नियमबाह्य शुल्क आकारणाऱ्या हॉटेलांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून याबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी, वाढत्या तक्रारी पाहता लवकरच तपासणी मोहीम राबवली जाईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
पुढील भागात वाचा..... फलटण मधील या हॉटेल मध्ये तर जाऊच नका..



















