आजपासून रात्रीची गस्त सुरु होईल - वनक्षेत्रपाल श्रीमती आर. एन. बोटकर जाधववाडी परिसरात तरस या प्राण्याच्या वावर असल्याच्या तक्रारी आले आहेत त्या अनुषंगाने आज रात्रीपासूनच परिसरामध्ये रात्रीची गस्त सुरू होईल, असे वनक्षेत्रपाल श्रीमती आर. एन. बोटकर यांनी सांगितले आहे.
फलटण प्रतिनिधी -
जाधववाडी (फ) परिसरातील विद्यानगर, महादेवमळा, शिंदेमळा, अक्षत पार्क, गणेश नगर, नाळेमळा, अक्षत रेसिडेन्सी, विमानतळ परिसर, बिरदेवनगर, मदनेवस्ती आदी भागांमध्ये तरस या वन्यप्राण्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या परिसरात तसेच विमानतळ परिसरामध्ये सकाळी आणि संध्याकाळी फिरण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची व लहान मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने संभाव्य दुर्घटनेची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन दि. २२ मे २०२६ रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी, फलटण यांची भेट घेत निवेदन सादर केले.
निवेदनामध्ये परिसरात नियमित गस्त वाढविणे, तरस पकडण्यासाठी पिंजरे लावणे तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करणे अशा उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या मागण्यांची सकारात्मक दखल घेत तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती देण्यात आली.










