फलटण - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीने विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते शहरासह संपूर्ण तालुक्यात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.
दिनांक १३ रोजी रात्री ११ वाजता बौद्ध बांधवांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यांनतर त्रिसरण पंचशील ग्रहण करून, रात्री १२ वाजता आंबेडकरी नूतन वर्षाचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले.
दिनांक १४ रोजी सायंकाळी शोभायात्रेचा शुभारंभ करण्यात आला. शोभा यात्रेत विविध चित्ररथामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध यांच्या आकर्षक प्रतीकृती व देखावे केल्यामुळे नागरिकांनी मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी केली होती. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, प्रांताधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस , तहसीलदार अभिजित जाधव, फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे, पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा, पोलिस निरीक्षक सुनिल महडिक,गट विकास अधिकारी चंद्रकांत बोडरे आदी मान्यवरांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालुन अभिवादन केले. तसेच शहर व तालुक्यातील विविध मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. फलटण शहर व तालुक्यातील विविध सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था वगैरे ठिकाणी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) फलटण आगार व कामगार संघटना तसेच रिक्षा संघटनेच्यावतीने बसस्थानकावर मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.रिक्षा संघटनेच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात आले होते. दिनांक १४ रोजी सायंकाळी ७ वाजता पंचशील चौक, मंगळवार पेठ येथून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमा व चित्ररथासह शहर व तालुक्यातील ग्रामस्थांच्या सहभागाने आकर्षक विद्युत रोषणाई व सजावटीत प्रचंड मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीची सुरुवात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली. या प्रसंगी माजी नगरसेवक अनिकेतराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून शोभायात्रेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी जयंती मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.