वास्तविक पाहता औद्योगीकरण उभे राहत असताना स्थानिक ग्रामस्थ व शेतकरी यांनी आपल्या पिढ्यानपिढ्याच्या जमिनी औद्योगीकरण उभे राहावे यासाठी कवडीमोड किमतीत दिलेले असतात. त्यावेळी भूमिपुत्रांना योग्य न्याय देत नोकरीत सामावून घेणे गरजेचे असते. मात्र गेले अनेक वर्ष लढा देऊनही कमिन्स कंपनीने स्थानिक भूमिपुत्रांना योग्य न्याय दिला नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. सदर आंदोलन चिघळण्याची शक्यता असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
फलटण : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात एमआयडीसी सुरवडी (फलटण ) येथे गेले अनेक वर्षापासून सुरू असलेल्या कमिन्स या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीत सामावून घ्या या प्रमुख मागणीसाठी आज गुरुवार दिनांक 9 मार्च रोजी सकाळ पासूनच कमिन्स कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुरवडी येथील ग्रामस्थ व तरुणांनी ठिय्या आंदोलन सुरू केले असून स्थानिकांना नोकरीत सामावून घ्या अशा आशयाच्या घोषणा सुरु आहेत.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी, सुरवडी (फलटण )येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा मध्ये कमिन्स ही बहुराष्ट्रीय कंपनी गेले अनेक वर्षापासून सुरू आहे. वास्तविक पाहता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला जागा उपलब्ध करत असताना सुरवडी येथील ग्रामस्थांनी जागा देऊनही आज पर्यंत या कंपनीने स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीत सामावून घेतले नसल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.
26 जानेवारी 2023 रोजी सुरवडी येथील ग्रामसभेमध्ये कमिन्स कंपनीने तात्काळ स्थानिकांना नोकरीमध्ये समाविष्ट करून घ्यावयाचा ठराव करीत कमिन्स कंपनीच्या प्रशासनाला या संबंधित माहिती दिली होती. फेब्रुवारी 2023 अखेर आपण याविषयी योग्य तो निर्णय घेऊ असे कमीन्सने कळविले होते. मात्र अद्याप पर्यंत कमिन्स कंपनीकडून कोणताही निर्णय घेतला नसल्याने सदर आंदोलन सुरू असल्याचे आंदोलनकर्त्यांनी धैर्य टाईम्सशी बोलताना सांगितले.
या संदर्भात पुढील अपडेट लवकरच...