लहान मुले मोठ्या अपेक्षेने क्रीडा अकॅडमीमध्ये प्रशिक्षणासाठी दाखल होत असतात. मात्र, खेळासाठी आवश्यक साहित्य पुरविण्याच्या नावाखाली नफेखोरी होत असल्यास विद्यार्थ्यांच्या पालकांचा विश्वास डळमळीत होण्याची शक्यता आहे
फलटण प्रतिनिधी :
फलटणच्या क्रीडा क्षेत्रातील व्यवहारांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण सास्तूरकर यांनी आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे. क्रीडा साहित्य खरेदीच्या व्यवहारात आपली आर्थिक लूट झाल्याचे सांगत त्यांनी फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी (डी.वाय.एस.पी.) कार्यालयाकडे न्यायासाठी धाव घेतली असून, जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातील आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
डॉ. सास्तूरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते आपल्या पाल्यांसाठी धनुष्यबाणाची केवळ दोरी खरेदी करण्याच्या उद्देशाने फलटण येथील दिशा धनुर्विद्या अकॅडमीचे संचालक व प्रशिक्षक सूरज ढेंबरे यांच्या चॅम्पियन स्पोर्ट्स क्रीडा शॉपी येथे गेले होते. मात्र, त्यांना नवीन धनुष्यबाणाचा संच (आर्चरी सेट) खरेदी करण्यास प्रवृत्त करण्यात आले. संबंधित साहित्य बाजारभावापेक्षा जवळपास दुप्पट किमतीने विकण्यात आल्याचा आरोप डॉ. सास्तूरकर यांनी केला आहे.
धनुष्यबाणाच्या संचासह अन्य क्रीडा साहित्याचीही खरेदी करण्यात आली होती. मात्र, खरेदी केलेले साहित्य वेळेत उपलब्ध न झाल्याने जवळपास महिनाभर प्रतीक्षा करावी लागली. या कालावधीत मोठ्या प्रमाणावर मानसिक त्रास सहन करावा लागल्याचे डॉ. सास्तूरकर यांनी सांगितले.
क्रीडा प्रशिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची दिशाभूल?
लहान मुले मोठ्या अपेक्षेने क्रीडा अकॅडमीमध्ये प्रशिक्षणासाठी दाखल होत असतात. मात्र, खेळासाठी आवश्यक साहित्य पुरविण्याच्या नावाखाली नफेखोरी होत असल्यास विद्यार्थ्यांच्या पालकांचा विश्वास डळमळीत होण्याची शक्यता आहे. देशात खेळांना अपेक्षित महत्त्व मिळत नसताना, क्रीडा क्षेत्रात अशा प्रकारचे व्यवहार होत असल्याचा आरोप डॉ. सास्तूरकर यांनी केला आहे.
'तुम्हाला तुमचे साहित्य विकायचे आहे की विद्यार्थ्यांना खेळ शिकवायचा आहे?' असा सवाल उपस्थित करत त्यांनी क्रीडा प्रशिक्षण आणि साहित्य विक्री यामधील व्यावसायिक हितसंबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
मुलींना अकॅडमीमध्ये प्रवेश नाकारल्याचा आरोप
या प्रकरणाला आणखी गंभीर वळण देताना, आपल्या दोन मुलींना सूरज ढेंबरे यांनी अकॅडमीमध्ये प्रशिक्षणासाठी येण्यास मनाई केल्याचे एका मध्यस्थामार्फत समजल्याचा दावा डॉ. सास्तूरकर यांनी केला आहे.
या संपूर्ण प्रकरणाबाबत त्यांनी डी.वाय.एस.पी. कार्यालयाकडे अधिकृत तक्रार दाखल केली असून, संबंधित व्यवहारांची सखोल चौकशी करून न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. तसेच जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातील आर्थिक व्यवहारांची व्यापक चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
क्रीडा क्षेत्र हे विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारे व्यासपीठ असताना, त्याच क्षेत्रातील आर्थिक व्यवहारांबाबत निर्माण होणारे प्रश्न आणि आरोप यांची निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे असल्याची भूमिका डॉ. किरण सास्तूरकर यांनी मांडली आहे.


















