फलटण प्रतिनीधी:- पोलिस असल्याची बतावणी करून इथे मर्डर झाला आहे त्याची चेकींग चालु आहे असे सांगून एका वृद्ध व्यक्तीच्या खिशातील १५ हजार रुपये तसेच हातातील एक सोन्याची अंगठी लपास केल्या प्रकरणी दोन अनोळखी व्यक्तीची विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, तांबमळा येथील शासकीय गोडावुनचे समोर रोडवर दिनांक १ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी कुंडलीक बबनराव निंबाळकर (वय ६५ वर्षे, व्यवसाय- डेअरी शाँप ,रा.तांबमळा, फरांदवाडी, ता.फलटण) यांची दोन अनोळखी इसमांनी गाडी थांबवुन त्यातील पावसाळी जर्कींग घातलेल्या इसमाने फिर्यादीस मी पोलिस आहे. इथे मर्डर झाला आहे. त्याची चेकींग चालु आहे असे सांगुन मला तुमचे खिशात काय आहे ते दाखवा असे म्हणुन तुमच्याकडे जे काही आहे ते या रुमालात ठेवा असे सांगितल्याने, फिर्यादीने त्यांचे खिशातील १५ हजार रुपये तसेच हातातील एक सोन्याची अंगठी काढुन त्या रुमालावर ठेवली. त्यावेळी रुमालाची गाठ बांधुन त्याने तो रूमाल फिर्यादीस खिशात ठेवण्यास सांगुन फिर्यादीचा विश्वास संपादन करून पोलिस असल्याची बतावणी करून, फिर्यादीची सोन्याची अंगठी व रोख रक्कम १५ हजार रुपये घेवुन निघुन गेले. या प्रकरणी दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास मपोहवा चव्हाण करत आहेत.