फलटण प्रतिनिधी :
मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी, पोलीस जवान, भारतीय सैन्य दलातील जवान तसेच निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार, दिनांक 26 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत फलटण शहर पोलीस स्टेशन येथे हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या उपक्रमाचे आयोजन सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे (भा.पो.से.) व अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव (म.पो.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासोबतच रक्तदानातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात येणार आहे.
सातारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून रक्तदानाच्या कार्यात सहकार्य करावे, असे आवाहन सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.
















