फलटण प्रतिनिधी :
फलटण नगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांनी एकत्र येत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या विजयामुळे राजे गटाच्या तब्बल ३५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागला असून, रामराजे यांच्या नेतृत्वाचा बुरुंज अखेर ढासळल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
भाजप–राष्ट्रवादी काँग्रेस युतीने नगराध्यक्ष पदासह एकूण १८ नगरसेवक निवडून आणत नगरपालिकेवर वर्चस्व प्रस्थापित केले. या यशामागे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, शिवरूपराजे खर्डेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे कसून प्रयत्न कारणीभूत ठरले.
दरम्यान, नगराध्यक्ष पद भाजपाकडे गेले असताना आता उपनगराध्यक्ष पद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला द्यावे, अशी जोरदार मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. युतीच्या विजयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली असल्याने, सत्तेत समतोल राखण्यासाठी उपनगराध्यक्ष पद राष्ट्रवादी काँग्रेसकडे द्यावे, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली आहे.
या मागणीवर भाजप–राष्ट्रवादी युतीचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात, याकडे आता फलटण शहरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.



















