फलटण प्रतिनिधी - भिवंडी जि. ठाणे येथील दलित समाजातील अल्पवयीन युवक संकेत भोसले याची शुल्लक कारणावरून निर्घृण हत्या केल्याच्या निषेधार्थ आज फलटण येथे विविध संघटनाच्या माध्यमातून निषेध मोर्चा काढत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. तहसीलदारांच्या वतीने हे निवेदन नायब तहसीलदार सौ. संजीवनी सावंत यांनी स्वीकारले. आज फलटण येथील व्यापारांनी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या निवेदनात असे म्हटले आहे की, भिवंडी येथील दलित समाजातील अल्पवयीन युवक संकेत भोसले याची शुल्लक कारणावरून निर्घृण हत्या केल्याच्या निषेधार्थ संपूर्ण दलित समाज पेठून येथून उठला आहे. कॉलेज मधील किरकोळ वादातून हे हत्याकांड झाले आहे. संकेत भोसले या युवकास अपहरण करीत गंभीर मारहाण झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
तरी या प्रकरणातील सर्व आरोपीना कडक शासन झाले पाहिजे, व त्या आरोपींवर मोक्का UAPA या कायद्यांतर्गत कारवाई करून संकेत भोसले यास न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी फलटण बौद्ध समाजाच्या वतीने करण्यात येत आहे. तरी या भीमसैनिकाला न्याय मिळावा आणी त्याच्या कुटुंबाच पुनर्वसन करण्यात अशी विनंती या निवेदनात शेवटी करण्यात आली आहे.
आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन येथून मोर्च्याला सुरुवात करण्यात आली. या मोर्चामध्ये विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, तरुण, महिला यांनी सहभाग घेतला होता. विविध दलित समाज संघटनेकडून संकेत भोसलेच्या अमानवी हत्याकांडाच्या निषेधार्थ सोमवार दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी संपूर्ण फलटण शहर बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यास प्रतिसाद देत फलटणमधील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवत या बंदला संपूर्ण पाठिंबा दिला. निवेदन देतेवेळी विविध मान्यवरांनी या घटनेबद्दल निषेध करणारी भाषणे केली.