सातारा, दि. 26 – जगातील 23 वर्षाखालील तरुणांकरिता, त्यांच्यातील कौशल्य सादर करण्यासाठी, दर दोन वर्षांनी जागतिक कौशल्य स्पर्धा आयोजित करण्यात येते. यंदाच्या वर्षी ही स्पर्धा फ्रान्समधील ल्योन येथे होणार आहे. त्याअनुषंगाने जागतिक स्तरावरील स्पर्धेच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने 52 क्षेत्रांशी संबधित जिल्हा व राज्यस्तरावर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, सेक्टर स्कील कौन्सिल, विविध औद्योगिक आस्थापना यांच्या सहकार्याने, स्किल कॉम्पिटीशन आयोजित करण्यात आले आहे.
सदर स्पर्धांचे आयोजन जिल्हा, विभाग, राज्य व देश पातळीवर करून निवड झालेल्या उमेदवारांची नावे जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येणार आहेत. या स्पर्धेचे पात्रता निकष पुढीलप्रमाणे आहेत.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराचा जन्म 1 जानेवारी 2002 किंवा नंतरचा असणे आवश्यक आहे. तसेच ॲडिटीव्ह म्यॅन्यूफॅक्चरिंग, क्लाऊड कंम्प्युटिंग, सायबर सिक्युरिटी, डीजिटल कन्स्ट्रक्शन, इंडस्ट्रियल डिझायन टेक्नॉलॉजी, इंडस्ट्री 4.0, इन्फॉर्मेशन नेटवर्क गॅबलिंग, मेकॉट्रॉनिक्स, रोबोट सिस्टिम, इंटिग्रेशन ॲन्ड वॉटर टेक्नॉलॉजी या क्षेत्राकरिता उमेदवाराचा जन्म 1 जानेवारी 1999 किंवा नंतरचा असणे अनिवार्य आहे.
सर्व तंत्रशिक्षण संस्था, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या जिल्हा, विभाग, राज्य व देशपातळीवरील स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धेचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना वेळोवेळी लागणारे मार्गदर्शन व सहकार्य कौशल्य विकास, रोजागार व उद्योजकता मार्गदर्शन कार्यालयामार्फत करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी https://kaushalya.mahaswayam.gov.in या लिंकवर नावनोंदणी करावी.
अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व मार्गदर्शन केंद्र, 02162-239938 या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन सुनिल पवार, सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सातारा यांनी केले आहे.