ही घटना 2016 मध्ये घडलेली आहे. आरोपी संदीप देशमुख याने पिडीत मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असतानाही त्याने मुलीला विवाहाचे आमिष दाखवले. त्याद्वारे वेळोवेळी अत्याचार केले.
सातारा : अल्पवयीन मुलीला विवाहाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार करुन गर्भवीत केल्याप्रकरणी संदीप तानाजी देशमुख (वय 39, रा.सोनगाव, ता.जावली) याला विशेष जिल्हा न्यायाधिश ए.के.पटणी यांनी 10 वर्षे सक्तमजुरी व 10 हजार रुपये दंड तो न भरल्यास 6 महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली.
याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना 2016 मध्ये घडलेली आहे. आरोपी संदीप देशमुख याने पिडीत मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असतानाही त्याने मुलीला विवाहाचे आमिष दाखवले. त्याद्वारे वेळोवेळी अत्याचार केले. यामुळे मुलगी गर्भवती राहिली व तिने मुलाला जन्म दिला. या घटनेनुंतर मात्र संदीप देशमुख याने मुलीला लग्न करणार नसल्याचे सांगून फसवले.
या सर्व घटनेनंतर मुलीने मेढा पोलीस ठाणे गाठून घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य पाहून संदीप देशमुख याच्याविरुध्द पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. या घटनेचा तपास पोलीस उपअधीक्षक यशवंत काळे व अजित टिके यांनी करुन सातारा जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा न्यायालयात सरकार पक्षाने 11 साक्षीदार तपासले. या घटनेत डीएनए रिपोर्ट निगेटिव्ह असतानाही परिस्थितीजन्य पुरावा व साक्षीदारांचे जबाब यावरुन आरोपीला शिक्षा ठोठावण्यात आली. सरकार पक्षाच्यावतीने अॅड.नितीन मुके यांनी युक्तिवाद केला.