वाठार स्टेशन : मुकुंदराज काकडे :
कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक येथील टायरच्या दुकानाला आज दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली.
या आगीमध्ये शेजारी असणाऱ्या टू व्हीलर गॅरेजमध्ये लावलेल्या दोन दुचाकी जळून खाक झाल्या. आग एवढी भीषण होती की रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना आगीमुळे तब्बल अर्धा तास थांबावे लागले.
वाठार स्टेशन पोलिसांना ही बातमी समजतात त्यांनी लगेच घटनास्थळावर धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने आग आटोक्यात आणली.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार दुपारच्या दरम्यान कोणीतरी व्यक्तीने आजूबाजूचे गवत पेटवण्यासाठी ही आग लावल्याचे समजते व याच आगीमुळे शेजारी असणाऱ्या टायरच्या दुकानाला भीषण अशी आग लागली व याआगीने एवढे रौद्ररूप धारण केले होते की यामध्ये शेजारी असणारे दुचाकी गॅरेजही पेटले व यात असणाऱ्या दोन दुचाकी गाड्याही आगीत भस्मसात झाल्या.
पोलिसांच्या व पिंपोडे बुद्रुक ग्रामस्थांच्या कार्य तत्परतेमुळे तब्बल दीड तासाच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात मदत झाली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच या आगीमुळे सर्व पिंपोडे बुद्रुक परिसरात काळा धूर पसरल्याचे चित्र दिसून येत होते.