फलटण प्रतिनिधि - विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया आजपासून सुरु झाली आहे. दिनांक २२ ऑक्टोबर पासून २९ ऑक्टोबर रोजी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशन दाखल करता येणार आहे. आज दिनांक २२ रोजी सकाळी १० वाजता नामनिर्देशन पत्रांची विक्री तहसील कार्यालय या ठिकाणी स्वतंत्र कक्षात सुरु झाली. सकाळी १० ते १ वाजेपर्यंत केवळ ३ तासात २० फॉर्मची विक्री झाल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.
यामध्ये विद्यमान आमदार दिपक चव्हाण यांनी पहिल्याच दिवशी नामनिर्देशन पत्रांची खरेदी केली आहे. तर दिगंबर आगवने यांनीही नामनिर्देशन पत्रांची खरेदी केली आहे. बहुतांश उमेदवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नामनिर्देशन पत्रांची मागणी केली असून अपक्ष उमेदवारांची संख्याही मोठी आहे.
दिनांक ३० ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी केली जाईल तर दि ४ नोव्हेंबर पर्यंत नामनिर्देशन अर्ज मागे घेता येतील आणि दिनांक २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल दिनांक २३ नोव्हेंबर ला मतमोजणी करण्यात येणार आहे.