फलटण प्रतिनिधी :- रविवार पेठे येथील फळ व पंतंग गोडाऊनचा दरवाजा तोडून अज्ञात चोरटयांनी ड्रॉवर मधून ४५ हजार ५०० रोख रक्कम तसेच उधारीची वही व मालाच्या आवक जावकची बिले चोरुन नेल्याची घटना घडली असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार,फिर्यादी मुबीन कबीर मेटकरी(रा. मेटकरी गल्ली, फलटण) हे २४ रोजी सकाळी ९: ४५ वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे नगर परिषदेच्या पाठीमागील बाजूस रविवार पेठे येथे असणारे फळ व पंतंग गोडाऊन उघडायला गेले असता त्यांना गोडाऊनचा अर्धा दरवाजा उघडा दिसला म्हणून फिर्यादी यांनी दरवाजा उघडून आत जाऊन गोडाऊन मध्ये असलेली तीनही काउंटर चेक केले असता त्यावेळी त्यांना काउंटरच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली रक्कम व कागदपत्रे दिसून आली नाहीत म्हणून त्यांनी घरातील व्यक्तींना बोलवून घेऊन सदर चोरीचा प्रकार सांगितला. दिनांक २३ रोजी रात्री १०:३० ते दिनांक २४ रोजी सकाळी ९:४५ वाजण्याच्या दरम्यान ही चोरी झाली असून फिर्यादी यांच्या फळाच्या व पतंगीच्या गोडाऊनचा मागील दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करून गोडाऊन मधील ड्रॉवर मधून फिर्यादी यांची ४५ हजार ५०० रोख रक्कम तसेच उधारीची वही व मालाच्या आवक जावकची बिले ही चोरून नेली आहेत. याप्रकरणी फिर्यादी यांनी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून शहर पोलिस अधिक तपास करत आहेत.