फलटण प्रतिनिधी -
फलटण शहरातील मलठण येथे राहणाऱ्या शेखर रणवरे यांच्या निवासस्थानी गेल्या तीन दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून कसून चौकशी सुरू आहे. ही चौकशी इंदापूर तालुक्यातील नेचर डीलाईट या कंपनीच्या संबंधित असणाऱ्या सर्व व्यक्तींच्या सखोल तपासात्मक कामकाजाचा एक भाग म्हणून सुरू असल्याची चर्चा सध्या शहरात सुरू आहे.
इंदापूर तालुक्यातील नेचर डीलाईट कंपनी विविध आर्थिक अनियमिततेच्या आरोपांनी वेढली गेली असल्याची माहिती फलटण येथील घटनास्थळावरून पुढे येत आहे. या कंपनीशी संबंधित असणार्या व्यक्तींवर केंद्रीय तपास यंत्रणेने लक्ष केंद्रित केले आहे, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्यात येत आहे. रणवरे यांचा या कंपनीशी असलेला संबंध हे तपासाचे एक महत्त्वाचे केंद्र असल्याची चर्चा फलटण तालुक्यात सुरू आहे.
गेल्या तीन दिवसांपासून, केंद्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी रणवरे यांच्या निवासस्थानी तपास सुरू केला आहे. या चौकशीदरम्यान, रणवरे यांच्या वैयक्तिक दस्तऐवज, आर्थिक व्यवहार, व्यावसायिक करार आणि इतर संबंधित माहितीची तपासणी करण्यात येत आहे. चौकशीच्या दरम्यान, तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी रणवरे यांची विस्तृत चौकशी केली आहे.
गोळीबाराची जोरदार चर्चा
दि. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी चौकशी दरम्यान रणवरे यांनी सहकार्य न केल्याने हवेमध्ये गोळीबार झाल्याची चर्चा फलटण शहरात सुरू आहे. मात्र, या चर्चेसाठी अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळाला नाही. या घटनेबाबतची अधिकृत माहिती अद्याप प्राप्त झाली नसल्याने होत असलेल्या चर्चेच्या प्रत्येक बाबतीत शंका आहे. आयकर विभागाने याबाबत सविस्तर माहिती दिल्यास सर्व चर्चांना पूर्णविराम मिळणार आहे.